“भावी काळात पदवीपेक्षा कौशल्यांना जास्त महत्त्व!” – ॲड. प्रवीण निकम

0
259

पिंपरी , दि. ८(पीसीबी) “भावी काळात पदवीपेक्षा कौशल्यांना जास्त महत्त्व राहील!” असे प्रतिपादन युवाव्याख्याते ॲड. प्रवीण सुनीता संजय निकम यांनी चापेकर स्मारक, चापेकर चौक, चिंचवड येथे शनिवार, दिनांक ०७ मे २०२२ रोजी केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘स्वप्नपूर्तीच्या राजमार्गाने जाताना युवकांसाठी आवश्यक महत्त्वपूर्ण कौशल्य व उच्चशिक्षणाची संधी’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना ॲड. प्रवीण निकम बोलत होते. पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप अध्यक्षस्थानी होते. काँग्रेस माजी शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, प्रा. मनीष केळकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, विपुल नेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी संजय गायके यांचा कोरोनायोद्धा म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना संजय गायके यांनी, “गांधीपेठ तालीम मित्रमंडळाने पूर्वी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांपासून मी प्रेरणा घेतली.

त्यामुळे कोविड काळात सुमारे अडीच हजार रुग्णांना मी प्लाझ्मादान करू शकलो!” अशा भावना व्यक्त केल्या. कै. गजानन पोपटराव चिंचवडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानमालेचे हे द्वितीय पुष्प आयोजित करण्यात आले होते. महेश गावडे यांनी प्रास्ताविकातून गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उल्हास जगताप यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “पिंपरी-चिंचवड शहरात व्याख्यानमालांचे ज्ञानसत्र चालविण्यासाठी गांधीपेठ तालीम मित्रमंडळाने नेहमी पुढाकार घेतला!” असे गौरवोद्गार काढून ‘स्वच्छ भारत अभियान’ या उपक्रमांत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन केले. ॲड. प्रवीण निकम पुढे म्हणाले की, “अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना मन रमले नाही म्हणून मी चक्क कला शाखेत प्रवेश घेऊन राज्यशास्त्र या विषयांत पदवीधर झालो; परंतु उज्ज्वल कारकिर्द घडविण्यासाठी एवढे शिक्षण पुरेसे नाही याची जाणीव झाल्यावर २०१२ सालापासून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्चशिक्षण घेण्याचे स्वप्न पाहू लागलो. मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य असल्याने शिष्यवृत्ती मिळवूनच तेथे शिक्षण घ्यायचे, हा ठाम निश्चय केला होता. माझ्या शिक्षणाला मी संशोधनाची जोड दिली; आणि अथक परिश्रमातून २०२० साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिष्यवृत्तीच्या बळावर शिक्षण घेतले. याशिवाय मी तीन वेगवेगळ्या नोकऱ्या करून अर्थार्जन करीत होतो. आपल्या देशात पदवीला खूप महत्त्व दिले जाते; परंतु कौशल्याअभावी पदवीधर युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत.

‘घोका आणि ओका’ अशी आपल्याकडे अभ्यासाची पद्धत आहे. त्यामुळे काही सहकाऱ्यांच्या साहाय्याने आम्ही ‘नीतिकुशल’ हा उपक्रम सुरू केला. त्या उपक्रमांतर्गत आधी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर ते प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊ लागले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुमारे दोनशे विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या काही निकषांवर उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी इंग्लंड, अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकतात. याशिवाय तेथे श्रमप्रतिष्ठेला महत्त्व असल्यामुळे आपल्याकडे ज्या नोकऱ्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये गणले जाते, अशा नोकऱ्या परदेशात चांगल्या घरातील विद्यार्थी करीत असतात. साहजिकच परदेशात उच्चशिक्षण घेताना त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक भार सहन करावा लागत नाही. तीच मानसिकता आपल्याकडे रुजवायला हवी.

आता ऑनलाईन शिक्षण उपलब्ध झाले असल्याने अतिशय कमी खर्चात उच्चशिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडण्याची मुभा परदेशी विद्यापीठांमध्ये आहे. संशोधनवृत्ती, दीर्घकालीन उद्दिष्टे, कौशल्याधारित गुणवत्ता यांच्या बळावर आपल्याकडील विद्यार्थी उच्चशिक्षणाची आणि भरघोस पगाराची स्वप्नपूर्ती करू शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी परदेशात शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण घेतले होते. त्या प्रसंगाच्या शताब्दीचे औचित्य साधून किमान शंभर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी कटिबद्ध होऊ या!” व्याख्यानानंतर वेदान्त पाटील, रवी सूर्यवंशी आदी विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षण आणि शिष्यवृत्तीसंबंधी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून जाणून घेतले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. धीरज गुत्ते यांनी आभार मानले.