‘भारत हिंदू पाकिस्तान बनेल’ या विधानावरून शशी थरूर यांना कोर्टाचे समन्स

0
399

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – देशात पुन्हा भाजपाची सत्ता आली तर भारत हिंदू पाकिस्तान बनेल असे विधान करणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या विरोधात कोलकाता सत्र न्यायालयाने समन्स बजावले असून त्यांना हजर होण्यास सांगितले आहे. कोलकाता शहरातील वकिल सुमीत चौधरी यांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी तक्रीवरून कोर्टाने थरूर यांना समन्स बजावले आहे.

चौधरी यांनी थरूर यांच्या विधानाविरोधात बँकशाल कोर्टात गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे. शशी थरूर यांनी हे विधान करून भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांनी संविधानाचा अपमान केला आहे. धार्मिकतेच्या आधारावर त्यांना समाजात वाद आणि मतभेदांची दरी निर्माण करायची आहे. त्यांनी त्यांच्या विधानाबद्दलही माफी मागायला नकार दिला असे चौधरी यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात जम्मू-काश्मीरच्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उपाध्यक्ष नासीर उल इस्लाम यांना हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. शरद कुमार सिंह यांनी नासीर उल इस्लाम यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. भारतातील मुस्लिमांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र देशाची मागणी करण्याची गरज आहे असे विधान नासीर उल इस्लाम यांनी केले होते. कोर्टाने थरुर आणि नासीर उल इस्लाम या दोघांना १४ ऑगस्टला हजर होण्यास सांगितले आहे.