भारत पाश्चिमात्यांच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि वैचारिक गुलामगिरीमधून कधी मुक्त होणार ??

0
199

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – योगगुरु रामदेव बाबांनी स्वातंत्र्यासंदर्भात बोलताना आपण इंग्रजापासून राजकीय स्वातंत्र्य मिळवलं असलं, त्यांच्या गुलामगिरीमधून मुक्त झालो असलो तरी आजही आपण अनेक गोष्टींबाबत त्यांचं अनुकरण करत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. रामदेव बाबांनी भारत पाश्चिमात्यांच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि वैचारिक गुलामगिरीमधून कधी मुक्त होणार असा प्रश्न उपस्थित केलाय. एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये बोलताना रामदेव यांनी भारताला अजूनही अनेक गोष्टींबद्दल आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

ब्रिटिशांच्या राजकीय गुलामगिरीतून आपण मुक्त झालो आहोत पण आर्थिक, सांस्कृतीक, वैचारिक गुलामगिरीतून आपण कधी मुक्त होणार?, असा प्रश्न रामदेव बाबांनी उपस्थित केलाय. हा प्रश्न आपल्याला कायम पडतो असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी भारताला आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त केलंय. आजही अनेक गोष्टींसाठी आपण चीनवर तसेच युरोपमधील कंपन्यांवर अवलंबून आहोत असं सांगतानाच बाबा रामदेव यांनी आता भारताने या देशांवर विसंबून राहता कामा नये असं मत व्यक्त केलंय. इतर देशांवर निर्भर राहण्याऐवजी भारताने सर्वच क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्याची गरज आहे, असं रामदेव बाबा म्हणालेत.

विकासासंदर्भात बोलताना आपल्याला भारत हा जातीपात, प्रांत, भाषा आणि धर्मावरुन भेदभाव करणाऱ्या गोष्टींपासून मुक्त झालेला पहायचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत आपण मोठा प्रवास केलाय. मात्र हा प्रवास असाच सुरु ठेवण्यासाठी काही गोष्टी बदलण्याची आणि काही स्वीकारण्याची गरज असल्याचं मत रामदेव बाबांनी व्यक्त केलं आहे. भारताने केलेल्या प्रगतीबद्दल बोलताना सर्वसामावेश विकास असेल तरच देशाची प्रगती होते असं दिसून येत असल्याचं मत रामदेव बाबांनी व्यक्त केलंय. शेती, उद्योग, आरोग्य, संशोधन आणि सामाजिक जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एखादं राष्ट्र प्रगती करत तेव्हा त्यामध्ये एखाद्या विशिष्ट तत्वाचा सहभाग असतो असं नाही तर सर्व तत्वांचा समावेश असतो. असं झालं तर राष्ट्राचा सर्वांगीण विकास होतो. असे राष्ट्र सर्वस्पर्शी विकास करु शकते, असं मत रामदेव बाबांनी व्यक्त केलं आहे.

सर्वसामावेश विकास झाला तर आपण आपल्या शहीदांची स्वप्न पूर्ण केल्याचं ठामपणे सांगू शकते. आपल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक आयुष्यामध्ये आपले जे मूळ सिद्धांत आहेत ते देशातील धर्मनिरपेक्षता, समानता, सहिष्णूता, सद्भावना आणि एकात्मतेवर आधारित असून आपण हे सर्व पुढे घेऊन गेलं पाहिजे. भविष्यात एक देश म्हणून आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. खरं तर या विकासाच्या प्रवासाचा अंतर नसतो, असं मत रामदेव यांनी व्यक्त केलंय.

रामदेव बाबांनी ब्रिटिश राजवटीसंदर्भात बोलताना आपल्या मनात इंग्रजांबद्दल अद्यापही राग असल्याचं सांगितलं. मी लहानपणापासूनच काही गोष्टींबद्दल खूप आग्रही होतो. इंग्रजांनी आपल्या देशाची फार लूट केली. त्यामुळे मला आजही त्यांच्याबद्दल राग वाटतो. हा राग वैर म्हणून नाहीय पण माझ्यात एक झंझावात आहे. माझ्यामध्ये वीरता, पराक्रम, स्वाभिमानाची भावना आहे, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

लहानपणापासूनच मी जातीपातीचा भेदभाव, प्रांतवाद, भाषिक वादासारख्या गोष्टी पाहिल्या आहेत. मात्र या सर्व गोष्टींपासून आपल्या देशाने मुक्त व्हावं असं मला वाटतं. मला या गोष्टींपासून मुक्त झालेले भारत पहायचा आहे, असं मत रामदेव बाबांनी व्यक्त केलं आहे.