भारतीय ज्युडो संघाची ऑलिंपिक पात्रतेतून माघार

0
179

नवी दिल्ली, दि.०८ (पीसीबी) – ऑलिंपिक पात्रतेसाठी होणाऱ्या आशिया ओशियाना गचाकील पात्रता फेरीतून भारताच्या १५ सदस्यीय संघाला माघार घ्यावी लागली आहे. ही स्पर्धा किर्गिझस्तानात बिशकेक येथे सुरू आहे.

भारतीय संघाती अजय यादव आणि रितु हे दोन खेळाडू स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कोविड १९ चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. स्पर्धेसाठी भारतीय संघ किर्गिझस्तान येथे दाखल झाला तेव्हा घेण्यात आलेल्या चाचणीत यादव (७३ किले) आणि रितू (५२ किलो) हे दोघे दोषी आढळले. या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणे नव्हती. पण, त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण भारतीय संघासच स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

चार प्रशिक्षकांसह १५ खेळाडू यांची किर्गिझस्तानमध्ये दाखल झाल्यावर घेण्यात आलेली पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीत हे दोन खेळाडू दोषी आढळले. सध्या संपूर्ण भारतीय संघ बिशकेक येथील हॉटेलमध्ये विलगीकरणात आहे.

येथे दाखल होताच ४ एप्रिलला घेण्यात आलेल्या चाचणीत आम्ही सर्व निगेटिव्ह आलो होतो. मात्र, स्पर्धा सुरू होण्याच्या दिवशी काही क्षण आधी म्हणजे ५ एप्रिलला घेण्यात आलेल्या चाचणीत अजय आणि रितु पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशिक्षक जीवन शर्मा यांनी दिली. अजय आणि रितु दोघांमध्येही कोविडची कुठलीच लक्षणे नाहीत. दोघेही त्यांच्या हॉटेलमधील खोलीत आहेत आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून आहोत, असेही त्यांनी सांगितले.

आशिया ओशियाना गटातील या स्पर्धेला मंगळवारी सुरवात झाली असून, एखादा जरी खेळाडू पॉझिटिव्ह आढळला, तर संपूर्ण संघालाचा मघारा घ्यावी लागेल, असा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे भारतीय संघाला माघार घ्यावी लागली.

सुशिला देवी (४८ किलो), जसलीन सिंग सैनी (६६ किलो), तुलिका मान (७८ किलो), अवतार सिंग (१०० किलो) हे चार भारतीय प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळणार होते. आंतरखडातून मिळणाऱ्या एका ऑलिंपिक कोट्यासाठी हे चारही खेळाडू शर्यतीत होते.

स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी दोन आणि बिशकेक येथे दाखल झाल्याव दोन अशा चाचणीच्या चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. यातील अखेरच्या फेरीत दोन खेळाडू बाधित असल्याचे समोर आले. अर्थात, त्यांच्यात फार काही गंभीर लक्षणे नाही आणि त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.

साई आणि भारतीय राजकीय दूतावासामार्फत आम्ही किर्गिझस्तान सरकारशी संपर्क साधून आहोत. निगेटिव्ह असलेल्या खेळाडूंना भारतात पाठवण्यात यावे यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही साई अधिकाऱ्यांनी सांगितले.

या सर्व गलथानपणाला भारतीय ज्युडो महासंघ जबाबदार असल्याची चर्चा आता सुरू आहे. भारतीय संघाचा आकडा मोठा असताना सर्वांना एकत्र पाठविण्याची गरज होती का ? तीन टप्प्यात खेळाडूंना पाठवता आले असते. सर्वांना एकत्र पाठविल्यानेच ही वेळ आली आणि भारतीय खेळाडूंची संधी हुकली अशी टिका सुरू आहे.

संघ प्रशिक्षक शर्मा यांनी या घटनेला दुर्दैवी म्हटले आहे. मात्र, भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक पात्रतेसाठी अजून दोन संधी उपलब्ध आहेत आणि त्याचा ते फायदा उठवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एक स्पर्धा मे महिन्यात रशियात होणारी ग्रॅंड प्रिक्स स्पर्धा आणि दुसरी जूनमध्ये होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा. जागतिक स्पर्धा हंगेरीत होईल. अर्थात, सर्व वजनी गटात आपल्याला केवळ एकच कोटा मिळणार आहे. त्यामुळे तो मिळविण्यासाठी आपल्याला अधिका अधिक मानांकन गुण मिळवावे लागणार आहेत.