भारतात कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्यात येईल – नीती आयोग सदस्य व्ही. के. पॉल

0
328

नवी दिल्ली, दि.४(पीसीबी) – भारतात कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्यात येईल, असा दावा नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे, याचा सकारात्मक परिणाम दिसत असून देशातील कोरोनाचा संसर्ग लवकरच आटोक्‍यात येईल, असं व्ही के पॉल म्हणाले आहे. पॉल हे केंद्र सरकारने कार्यान्वित केलेल्या वैद्यकीय उपकरण पुरवठा आणि व्यवस्थापन गटाचे नेतृत्व करत आहेत. याआधी 2 वेळा लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा झालेला फायदा वाया जाऊ नये, यासाठी 4 मे नंतर पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढवण्यात आला. आता ज्या ठिकाणी कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झालेला आहे, त्या ठिकाणी चाचण्या घेऊन हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं ते म्हणाले.

दरम्यान आतापर्यंतच्या कडक लॉकडाऊनमुळे भारतातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश मिळाले आहे. सामाजिक पातळीवर भारतामध्ये संसर्ग झाला आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “तसे झाले असते तर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असती, इतर देशात ज्या वेगाने करोना व्हायरस वाढला आहे आणि मृत्यूचे प्रमाण जितके आहे त्यापेक्षा भारतातील परिस्थिती कितीतरी चांगली आहे, असं ते म्हणाले.