भारताचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाइटवॉश; एक डाव आणि २०२ धावांनी विजय

0
373

रांची, दि. २२ (पीसीबी) – टीम इंडियाने  तिसरी कसोटी  जिंकून  दक्षिण आफ्रिकेला  ‘व्हाइटवॉश दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर  गुंडाळला.  त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने खिशात घातली.

पहिल्या डावातील  हाराकिरीमुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की आली. त्यानंतर दुसऱ्या डावातही आफ्रिकेला चांगली कामगिरी करता आली नाही. डी कॉक, हामझा, बावुमा, हामझा आणि क्लासें या फलंदाजांना  दोन अंकी धावसंख्याही  करता  आली नाही.  सलामीवीर डीन एल्गर ला  चेंडू लागल्याने तो १६ धावांवर  रिटायर्ड हर्ट झाला.  त्याच्या जागी आलेला बदली खेळाडू डे ब्रून याने आफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांच्या साथीने   पराभव लांबणीवर टाकला.  पण चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अणि अवघ्या काही मिनिटात खेळ संपला. डे ब्रून (३०) आणि लुंगी एन्गीडी नदीमच्या सलग दोन चेंडूवर बाद झाले. मोहम्मद शमीने ३, उमेश यादव आणि शाहबाज नदीम २-२, तर जाडेजा व अश्विनने १-१ बळी टिपला.

त्याआधी, २ बाद ९ या धावसंख्येवरून खेळताना आफ्रिकेने पहिल्या सत्रात ४ तर दुसऱ्या सत्रात ४ गडी गमावले. आफ्रिकेचा कर्णधार पहिल्या डावात अपयशी ठरला. ९ चेंडूत १ धाव काढून तो बाद झाला. उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे आफ्रिकेची अवस्था ३ बाद १६ अशी झाली होती.  त्यानंतर मात्र भारताला गडी बाद करण्यासाठी काही काळ  प्रतिक्षा करावी लागली.