भाड्याने गाड्या घेऊन ट्रॅव्हल्स कंपनीकडून त्यांची परस्पर विक्री; शेकडो नागरिकांची फसवणूक

0
1549

येरवडा,दि.२५(पीसीबी) – भाड्याने चारचाकी वाहने घेऊन त्या फिल्म सिटी अथवा बँकेच्या अधिका-यांना ने-आण करण्यासाठी लावतो, त्याचा चांगला मोबदला देतो, असे आमिष दाखवून एका ट्रॅव्हल्स कंपनीने शेकडो वाहन मालकांना गंडा घातला आहे. अनेक वाहन मालकांची फसवणूक करून परस्पर वाहनांची विक्री केली आहे. ट्रॅव्हल्स कंपनीकडून मागील अनेक महिन्यांपासून ठरल्याप्रमाणे पैसे न मिळाल्याने फायनान्सचे हप्ते खिशातून भरण्याची वेळ या वाहन मालकांवर आली आहे. अनेक वाहन मालकांनी संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीच्या विरोधात पोलिसात धाव घेतली आहे.

प्रतिकनगर येरवडा येथील द सिटी ट्रॅव्हल्सच्या हैदर अली आलंदर हुसैन सय्यद याच्या विरोधात अनेकांनी येरवडा पोलीस ठाण्यात अर्ज केले आहेत. सय्यद याने वाहन मालकांच्या परस्पर त्यांची वाहने विकली आहेत. तसेच मूळ वाहन मालकांना ठरल्याप्रमाणे त्यांचे पैसे न देता त्यांची फसवणूक केल्याचे वाहन मालकांचे म्हणणे आहे.
वेणुनगर वाकड येथील रहिवासी रामदास पाखरे यांनी त्यांची इनोव्हा क्रिस्टा (एम एच 14 / एच जी 1213) हे कार सय्यद याच्या ट्रॅव्हल्स कंपनीला लावली. त्याचा कायदेशीर करार देखील करण्यात आला. सय्यद याने पाखरे यांना दरमहा 60 हजार रुपये देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याला कारची जास्तीत जास्त चार हजार रनिंग होईल. तसेच त्यांची कार फिल्म सिटी अथवा बँकेच्या अधिका-यांना ने-आण करण्यासाठी वापरणार, असे करारात ठरवले.
काही कालावधीनंतर पाखरे यांना माहिती मिळाली की, सय्यद याने अनेक वाहन मालकांच्या कार भाड्याने घेतल्या आहेत. त्यातील काही कार गुजरात, राजस्थान सीमेवर अवैधरीत्या वाहतुक करत आहेत. त्यामधील काही कार पोलिसांनी जप्त देखील केल्या आहेत. तसेच अनेक वाहन मालकांचे तीन ते चार महिन्यांपासून सय्यद याने पेमेंट देखील दिलेले नाही.

यामुळे पाखरे यांनी त्यांच्या कारचा वापर अवैध वाहतुकीसाठी होऊ नये, यासाठी जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने कारचा शोध घेतला असता त्यांची कार नागपूर येथे वैयक्तिक पांढरी नंबर प्लेट लाऊन वापरली जात होती. काही कालावधीनंतर कारचे जीपीएस ट्रॅकर डिव्हाईस काढल्याचे पाखरे यांच्या निदर्शनास आले. याबाबत पाखरे यांनी सय्यदच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली आणि कार परत देण्याची विनंती केली.

त्यावर सय्यद याने प्रथम अर्ज करा, त्यानंतर एक महिन्याने कार मिळेल. त्यानुसार पाखरे यांनी अर्ज केला आणि एक महिन्याने पुन्हा विचारणा केली. त्यावर सय्यद याने ‘गाडी देणार नाही, काय करायचे ते कर’ असे म्हटले. त्यामुळे पाखरे यांनी पोलिसांना कळवले आणि सय्यद याला पोलिसांसमोर उभे केले. त्यानंतर पाखरे यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.

मात्र, हा प्रकार केवळ पाखरे यांच्या सोबत झालेला नाही. तर शेकडो लोकांकडून सय्यद याने भाड्याने वाहने घेऊन त्यांची परस्पर विक्री केली आहे. मूळ वाहन मालकांना पैसे न देता त्यांची फसवणूक केली आहे. याबाबत सुमारे 60 जणांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार अर्ज केले आहेत. पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरु असून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.