भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खासगी रुग्णालयात फोन करून पैशांची मागणी करणाऱ्याचा शोध घेवून कडक कारवाई करा : आमदार महेश लांडगे

0
313

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खासगी रुग्णालयात फोन करून पैशांची मागणी करणाऱ्या अज्ञाताचा शोध घेवून त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर संघटक अमोल थोरात आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कोणी एका अज्ञाताने त्यांच्या नावाने पिंपरी-चिंचवड मधील एका खासगी रुग्णालयात फोन करून कोरोनाबाधित नागरिकांना मदत करण्यासाठी रुग्णालयाकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच हे पैसे न दिल्यास बघून घेण्याची धमकीही रुग्णालयाला त्या व्यक्तिने दिली आहे. याबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व त्यांच्या कार्यालयातील इतर कोणीही अशा प्रकारे पैशांच्या मागणीसाठी कोणालाही पैशांची मागणी केली नसल्याचे सांगितले. यावरून त्यांच्या नावाने कोणी अज्ञात व्यक्तीने रुग्णालयात फोन केल्याचे स्पष्ट झाले असून या संदर्भात संबंधित रुग्णालयाने पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील हे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या नावाचा गैरवापर करून रुग्णालयाकडे पैसे मागणे म्हणजे त्यांचे पद आणि समाजातील प्रतिष्ठेची बदनामी करणे तसेच पक्षाचीही प्रतिमा मलिन करण्याचा हा गंभीर प्रकार आहे. संबंधित अज्ञात व्यक्तीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून अशा प्रकारे अन्य काही जणांना फसविल्याचेही नाकारता येणार नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन गतीने तपास करावा. त्या अज्ञाताने इतर कुणाच्या नावाचा गैरवापर करून आणखी कोणाला फसविले असल्यास त्याचाही तपास व्हावा. रुग्णालयात फोन करून पैसे मागणाऱ्या संबंधित अज्ञाताचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेवून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्याकडे करण्यात आली आहे.