भाजप नगरसेवक विलास मडिगेरी मारहाण प्रकरणात दोषींवर दोन दिवसांत कारवाई करा; आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

0
549

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना महापालिकेत झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होत नसल्याने भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी (दि. ५) थेट पोलिस आयुक्त कार्यालयावर धडक दिली. मडिगेरी यांना शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर या तिघांनी मारहाण करून चार दिवस उलटले आहेत. याप्रकरणी मडिगेरी यांनी पोलिसांना जबाब दिलेला आहे. मग पोलिस कडक कायदेशीर कारवाई का करत नाहीत?, असा सवाल आमदार लांडगे आणि जगताप यांनी पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांना केला. संबंधित दोषींवर दोन दिवसांत कडक कारवाईची मागणी दोघांनी केली. राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली कारवाई होणार नसेल तर योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशाराही पोलिस आयुक्तांना दिला. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या पाठीशी पक्ष भक्कमपणे उभा असल्याचे आमदार लांडगे आणि जगताप यांनी पोलिस आयुक्तांना ठणकावून सांगितले.

स्थायी समितीचे माजी सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. विलास मडिगेरी यांना सोमवारी दि. १ जून रोजी सायंकाळी महापालिकेतच जबर मारहाण करण्यात आली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे व पंकज भालेकर या तिघांनी मिळून मडिगेरी यांना ही मारहाण केली. त्याबाबत स्वतः मडिगेरी यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना जबाब दिलेला आहे. त्यांना कोणी आणि का मारहाण केली याबाबत पोलिसांसमोर स्पष्ट केले आहे.

मडिगेरी यांनी महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदासारखे महत्त्वाचे पद भूषविले आहे. अशा व्यक्तीला झालेली मारहाण शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या मारहाणीबाबत शहराच्या महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लांढे यांनीही पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांची भेट घेऊन मडिगेरी यांना मारहाण करणाऱ्या नगरसेवकांवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली. तसेच शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या दादागिरी आणि गुंडगिरीची पोलिस आयुक्तांना लेखी माहिती देऊन त्यांच्या दादागिरी आणि गुंडगिरीला कायमचा आळा घालावा, अशी मागणी केली होती.

मात्र पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांनी महापौरांचे फक्त निवेदन घेतले. मात्र दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही. मडिगेरी यांना मारहाण होऊन चार दिवस आणि महापौर व पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन तीन दिवस उलटले तरी पिंपरी-चिंचवड पोलिस काहीच कारवाई करत नसल्याने भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी (दि. ५) दुपारी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयावर धडक दिली. मडिगेरी यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर त्यांच्याशी दोन्ही आमदारांनी सविस्तर चर्चा केली. मारहाणीच्या घटनेला चार दिवस झाले. त्यानंतर महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कडक कायदेशीर कारवाईची मागणी केली. महापौर पोलिस आयुक्त यांच्याकडे पर्यटनाला आले नव्हते. शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनी आपले कर्तव्य बजवावे, हे सांगण्यासाठी महापौर आणि इतर पदाधिकारी आले होते. त्यानंतर पोलिस तातडीने पावले उचलतील आणि दोषी नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झालेले नाही, अशा शब्दांत दोन्ही आमदारांनी पोलिस आयुक्तांसमोर नाराजी व्यक्त केली.

कायदा सर्वांना समान असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोषी नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई का केली नाही?, असा सवालही दोन्ही आमदारांनी पोलिस आयुक्तांना केला. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांना मारहाण करणारे तीनही नगरसेवक हे राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करता पोलिस वेळकाढूपणा करत आहे. या प्रकरणात पोलिस गुंड प्रवृत्तीच्या तीनही नगरसेवकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, असे दिसून येत असल्याचे दोन्ही आमदारांनी पोलिस आयुक्तांना सांगितले. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून, त्याचे कोणीही समर्थन करू शकणार नाही. पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली न येता तीनही दोषी नगरसेवकांवर दोन दिवसांत कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली. अन्यथा योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा त्यांनी दिला. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या पाठीशी पक्ष भक्कमपणे उभा असल्याचे आमदार लांडगे आणि जगताप यांनी पोलिस आयुक्तांना ठणकावून सांगितले.