भाजपा आणि केजरीवाल सरकारमध्ये ‘घर घर राशन’ योजनेवरून आरोप-प्रत्यारोपंच्या फैरी !

0
254

नवी दिल्ली, दि.०६ (पीसीबी) : ‘घर घर राशन’ या दिल्ली सरकारच्या योजनेला केंद्राकडून स्थगिती देण्यात आली आहे. आता भाजपा व केजरीवाल सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाल्याचे दिसत आहे. योजनेला केंद्राकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकारपरिषद घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. यावर आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केजरीवालांच्या आरोपांचे खंडण करत, दिल्ली सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपा प्रवक्त संबित पात्रा म्हणाले कि, “केजरीवाल यांनी आज म्हणणं मांडताना सांगितलं की, पंतप्रधान मोदी दिल्लीच्या गरीब जनतेला त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवत आहेत आणि ‘घर घर राशन’ ला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर असं अजिबात नाही. पंतप्रधान मोदी नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट आणि पीएम गरीब कल्याण योजनेद्वारे दिल्लीच्या गरजूंना रेशन पोहचवत आहेत. मोदी सरकारने दिल्लीला आतापर्यंत नॅशनल फूड सिक्युरिटी अॅक्ट अंतर्गत ३७ हजार ४०० मेट्रीक टन धान्य पाठवले आणि पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५ जूनपर्यंत ७२ हजार ७८२ मेट्रीक टन धान्य पाठवले आहे. मात्र दिल्ली ५३ हजार मेट्रीक टन धान्यच उचलू शकली आहे आणि यातील केवळ ६८ टक्केच त्यांच्याकडून जनतेला वाटप झाले आहे.” असं देखील संबित पात्रा यांनी सांगितलं आहे.

तर, पत्रकारपरिषदेत पंतप्रधान मोदींवर थेट टीक करताना “जर या देशात पिझ्झा, बर्गरची होम डिलिव्हरी होऊ शकते, स्मार्ट फोन व कपड्यांची होम डिलिव्हरी होऊ शकते. तर मग गरिबांच्या घरी रेशनची होम डिलिव्हरी का नाही होऊ शकत? संपूर्ण देश जाणू इच्छित आहे की तुम्ही ही योजना रद्द का केली?” असा प्रश्न मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना विचारला होता.