भाजपाच्या भ्रष्ट कारभारात अजित पवार लक्ष घालणार का?

0
427

थर्ड आय – अविनाश चिलेकर –

‘नको भानामती नको बारामीती’, `भय, भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड शहर`, अशा मोठ मोठ्या वल्गना करत लोकांना भुलवत चार वर्षांपूर्वी भाजपाने महापालिकेची सत्ता हातात घेतली. चोवीस तास पाणी देऊ, पावणे दोन लाख अनधिकृत बांधकामे नियमीत करू, अनधिकृत बांधकामांची शास्ती माफ करू, प्राधिकरणातील सर्व वाढीव बांधकामे म्हणजेच अतिक्रमणे कायम करू, प्राधिकऱणातील मूळ (सन१९७२ मधील) शेतकऱ्यांना पाच गुंठे परतावा देऊ, रेडझोन चा प्रश्न निकाली करू अशा ढीगभर आश्वासनांचा जाहिरनामा होता. राज्यात, केंद्रात सत्ता होती म्हणून महापालिकेत यांच्या हातात कारभार दिला तर प्रश्न लवकर सुटतील असे जनतेला वाटले. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आणि मस्तवाल कारकिर्दीला नागरिक कंटाळले होते म्हणून भाजपाला मोठ्या विश्वासाने मते दिली होती. चार वर्षांत पूरता अपेक्षाभंग झाला. रोजची भ्रष्टाचाराची प्रकरणे पाहून मतदारांचे डोळे पांढरे होत आहेत. आपण हे काय करून बसलो याचा त्यालाच पश्चाताप होतोय. आगीतून फुफाट्यात पडल्याची सर्वसामान्य लोकांची भावना आहे. पुन्हा अशी चूक करणार नाही, असे मतदारच बोलतात. याचाच अर्थ किमान स्थानिक पातळीवर भाजपाच्या पापाचा घडा आता भरला आहे. या केलेल्या चुका सुधारायच्या आणि पापाचे प्रायश्चित घ्यायचे असेल तर भाजपाला आणखी एक वर्ष संधी आहे. अन्यथा २०२२ ची महापालिका विसरा, असेच म्हणावे लागेल.

“१५० कोटींचा स्मार्ट सिटी घोटाळा, एक झलक” –
राष्ट्रवादीच्या पापाचा घडा २० वर्षांनी भरला होता, पण भाजपाचा अवघ्या चार वर्षांत अगदी काठोकाठ भरला आहे. राष्ट्रवादीने जवाहरलाल नेहरू नागरी विकास पुर्ननिर्माण योजनेते (जेएनएनयूआरएम) झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सर्वात मोठा गाळा केला होता. सुमारे ७००-८०० रुपये चौरस फुटाचे बांधकाम १४०० रुपयांनी दिले होते. किती खाल्ले याची मोजणी करायची तर शून्य मोजायला जमानार नाही. त्या खालोखाल पाणी पुरवठा योजनेत बुडवले. ड्रेनेज, पावसाळी गटर्स, उड्डाण पूल, रस्ते, बीआरटी मध्येही वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. तोच आदर्श समोर ठेवून नंतर भाजपाने स्मार्ट सिटी मध्ये प्रचंड लूट केली. फक्त एकाच कामाबद्दल शहर शिवसेनेने गंभीर आरोप केलेत. १५० कोटींचा घोटाळा झाला असा गौप्यस्फोट त्यांनी केला. रस्ते खोदाईच्या एकाच कामात रथी महारथींचे हात ओले झाले. राज्यातील भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांपर्यंत याचे धागेदोरे थेट पोहचतात म्हणून राजकीय गोटात मोठी घबराट आहे. खरोखर या प्रकरणाची सखोल निपःक्ष चौकशी झालीच तर खूप मोठा राजकीय भूकंप होईल. भाजपाने कोणा कोणाचे `लाड` पुरवले ते आता उघड होईल. हे फक्त हिमनगाचे टोक आहे. भ्रष्टाचाराच्या या समुद्रात खोल पाण्यात गेल्यावर समजेल की ही पाईपलाईन कुठे कुठे जोडलेली आहे, त्याला तोटी कुठे व्हॉल्व कुठे आहे. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचे उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही एक सुवर्ण संधी आहे.

“केंद्राकडे ईडी चा पोपट, राज्याकडे सीआयडी” –
भाजपाचा खरा चेहरा लोकांसमोर आणायला स्मार्ट सिटी मधील कामांची सखोल चौकशी हे एकच प्रकरण पुरेसे आहे.
यापूर्वी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जायला एक अत्यंत किरकोळ असा विठ्ठल रुक्मिनी मूर्ती खरेदीतील घोटाळा कारण ठरला होता. म्हणजे तसे घोटाळे भरपूर उघड झाले होते, पण विठ्ठल रुक्मिनी मूर्ती ही अजित पवार यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी शेवटची घटका ठरली. तद्वत भाजपासाठीही घोटाळ्यांची मालिका मोठी आहे, पण स्मार्ट सिटीतील फक्त रस्ते खोदाईचे काम ही उंटाच्या पाठिवरची शेवटची काडी ठरेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त मनात आणले पाहिजे. तूर्तास तेसुध्दा इरेला पेटले आहेत. मुंबई महापालिकेची सत्ता हा भाजपचा संकल्प आहे, तसा पिंपरी चिंचवडची सत्ता हा आता राष्ट्रवादी काँग्रेसचा संकल्प आहे. सत्तेसाठी आघाडी सरकारमधील ठाकरे-पवार हेसुध्दा आता काहीही करू शकतात. केंद्राच्या तालावर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) शिवसेना आमदारावर छापा टाकते, कारवाई करते आहे. खरे तर त्यात गैर काहीच नाही, पण या कारवाईला राजकीय वास आहे. ही निव्वळ सूडबुध्दीतून केलेली कारवाई आहे. शिवसेनेच्या अन्य नेत्यांवरही अशी कारवाई होण्याची दाट शक्य आहे. मनी लॉन्ड्रींग हे मुख्य कारण आहे. आजचे एकजात सर्वच राजकारण आणि राजकारणी त्यात सापडू शकतात. एक रात्रीत कोणीही श्रीमंत होत नाही. प्रताप सरनाईक २० वर्षांत १२५ कोटींचे मालक कसे झाले असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. तोच प्रश्न एकजात सर्व राजकीय नेत्यांबद्दल आहे. त्यामुळेच ही कारवाई राजकीय आहे. आता त्याच न्यायाने राज्य सरकारने म्हणजेच ठाकरे व पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटी घोटाळ्याची चौकशी आणि कारवाई करायचे ठरवले तर काय होईल. भ्रष्टाचाराचा पैसा मनी लॉन्ड्रींग द्वारे काळ्याचा पांढरा केला जातो. इथेही असे किमान दान-पाच प्रताप सरनाईक सापडतील. शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपाच्या १२० नेत्यांची नावे ईडी ला पाठविणार असल्याचे सांगितले, त्यात पिंपरी चिंचवड मधील नेत्यांचे नाव आहे, असे म्हणतात. ठाकरे-पवार खरोखर हात घालणार की नुसते दबाव तंत्र वापरून दोन पैकी एखादा मोठा मासा गळाला लावणार ते पहायचे. तोवर या बिनपैशाच्या तमाशाचा आनंद घ्या.