भाजपाच्या भ्रष्टाचारापेक्षा राष्ट्रवादीच्या शेळपटपणाचीच चर्चा – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
872

पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत विभागाने छापा टाकला, त्याल उद्या (बुधवारी) आठवडा होईल. लांडगे यांना सोमवारी (दि.२३) अंतरिम जामीनही मिळाला, पण कर्मचारी न्यायालयीन कोठडीत राहिले. या प्रकऱणात भ्रष्टाचार हा मुख्य मुद्दा आहे. समिती कक्षात ८ लाख सापडे हे रेकॉर्डवर आले. नंतरच्या तपासणीत कपाटात पुन्हा ८ लाखाची वेगळी रोकड मिळाली, १६ नावांची पाकिटे मिळाली तसेच लांडगे यांच्या घरी ६ कोटी रोख मिळाले या निव्वळ गप्पा राहिल्या. स्थायी सद्स्यांचा खिसा झाडला तरी लाख रुपये खाली पडतील, असेही म्हणतात. आता ते खरे वाटते. माणूस मूळतः भ्रष्ट्र नसतो सत्ता माणसाला भ्रष्ट्र करते, हे १०१ टक्का पटते. मूळच्या भाजपा संस्कारात भ्रष्टाचारातला `भ्र` सापडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वच्छ प्रशासन देणारे तसेच `ना खाऊंगा ना काने दुंगा`, म्हणून लोकांनी निवडूण दिले. पिंपरी चिंचवड शहरात भाजपा विरोधी पक्षात असताना अगदी किरकोळ भ्रष्ट्राचारावर सुध्दा त्यावेळच्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला सळो की पळो करत होता. विठ्ठल रुक्मिनी मूर्तीच्या प्रकऱणात २५ लाखांचा घोटाळा झाला होता. १५०० रुपयेंची मूर्ती ३९०० रुपयेला खरेदी केली होती म्हणून लोक संतापले. त्या प्रकऱणात महापालिका सभागृहात गदारोळ झाला, तत्कालिन आयुक्तांनी चौकशी समिती नेमली, अहवालात आर्थिक अनियमितता झाल्याचे मान्य केले आणि दोन कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले. खरे तर, तो अत्यंत किरकोळ विषय होता. भाजपाने तो शहरभर इतका तापवला की त्यातून लोक भडकले, लोकांच्या भावना चेतवल्या गेल्या. राष्ट्रवादीने देवाला सुध्दा सोडले नाही, असा प्रचार झाला. त्याचे पर्यवसन जनमताचा रेटा निर्माण होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची अनिर्बंधत सत्ता पाहता पाहता अजित पवार यांच्या डोळ्यासमोर धुळीस मिळाली. अवघ्या वर्षा-सहा महिन्यांत त्यावेळच्या भाजपातील चाणाक्यांनी ही रणनिती यशस्वी करून दाखवली. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या भ्रष्टाचाराचे मोठे प्रकऱण अगदी पंचपक्वान्नाचे ताट असल्यासारखे समोर वाढून ठेवले. दुर्दैव असे की, आठवडा उलटला पण राष्ट्रवादी नेभळटासारखी डोळे, कान, तोंड झाकून गांधीबाबांच्या तीन माकडासारखी मूग गिळून बसली. आख्खी गावकी, नातेगोते, सोयरेधायरे राजकारण व राजकीय पक्ष विसरून एक झाले आणि नितीन लांडगे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले. समर्थन कऱणारी मंडळीसुध्दा तितकीच भ्रष्टाचारात आकंठ बुडाली असल्याने त्यांचे बळ कमी पडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना विठ्ठल मूर्ती आजही आठवते, पण भाजपाने स्मार्ट सिटी मध्ये पालिका धुतली, कचरा गोळा कऱण्याच्या ठेक्यात लुटले, कंत्राटी कामगारांच्या ठेक्यात दरमहा १५ कोटींचा मलिदा वाटून खाल्ला, अगदी संतपीठ ५० कोटी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी ४० कोटी खर्च काढला. दोन्ही आमदारांनी ठेके वाटून घेतले. आता नितीन लांडगे यांच्या निमित्ताने चोरी रंगेहात पकडली गेली, पण तरिसुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात असूनही डोळेझाकून घेते. त्यामुळे भाजपाचा भ्रष्टाचारापेक्षा आता राष्ट्रवादीच्या नेभळट, बुळचट म्हणा की शेळपटपणाचीच चर्चा शहरभर अधिक आहे.

भाजपाला वैचारीक भ्रष्टाचार नडला –
खरे तर, वाजपेयी, आडवाणी यांची भाजपा अशी नव्हती हो. गल्ली ते दिल्ली सत्तेच्या लालसेपोटी गुंड, मवाली, भ्रष्ट्र, बदनाम लोकांना सरसकट भाजपात घेतले आणि एका चांगल्या राजकीय संस्कृतीचा यांनी अक्षरशः उकिरडा केला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला सत्ता आयुष्यात मिळाली नसती. राष्ट्रवादीचे दोन आमदार ३०-४० आजी-माजी नगरसेवक यांना भाजपाची जपमाळ दिली आणि पावन करुन घेतले. `मुह मे राम बगल मे सुरी`, असे लोक भाजपात आले. इथे तडजोड सुरू झाली तिथेच भाजपाला तडा गेला. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हेच ज्यांचे ध्येय आहेत ते बदमाश लोक भाजपाच्या आश्रयाला आले. साधु संतांचा पक्ष गुंडापुंडांचा झाला. भ्रष्टाचार फक्त पैशाचा नसतो तर विचारांचाही असतो हे दिसले. पिंपरी चिंचवड भाजपाच्या सत्तेची पायाभरणीच अशा वैचारीक भ्रष्ट्राचारातून झाली. आज त्याची कडू फळ चाखायला मिळतात. तुळशीमध्ये भांगेचे रोप कसे आले तर ते असे आले. उद्या राष्ट्रवादीची सत्ता येणार असे दिसले, तर ही भूते तिकडे पळतील. कारण त्यांना तत्व, निष्ठा, धर्म, न्याय याचे काही देणेघेणे नाही. सत्ता हेच त्यांचे इप्सित असते. जे भाजपामध्ये आले आणि आता पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, त्यातली बहुतांशी मंडळी याच जातकुळीची आहेत. ज्याला गावच्या भाषेत बांडगूळ (परावलंबी) म्हणतात.

उद्या काय होणार, याकडे लक्ष –
स्थायी समितीचा आठवडे बाजार उद्या (दि.२५) आहे. आता पुन्हा नितीन लांडगे हेच अध्यक्ष म्हणून बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा हा नेहमी नितीचे धडे देणारा पक्ष समजला जातो. लालकृष्ण आडवाणी यांच्यावर हवाला प्रकऱणात फक्त आरोप झाला होता, तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी पदाचा राजीनामा दिला. एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी जमीन घोटाळा प्रकऱणात गंभीर आरोप झाला म्हणून सर्वांत जेष्ठ असूनही त्याना मंत्री पदाचा राजीनामा देणे देवेंद्र फडणवीस यांनी भाग पाडले. अशी शेकडो उदाहरणे देता येतील. आरोपातून मुक्त होत नाही तोवर पदापासून बाजुला होण्याची भाजपाची परंपरा आहे. आता भाजपानो ते सोवळे टाकून दिले की काय, अशी शंका येते. आठवड्यापूर्वी भ्रष्टचाराचे प्रकरण झाले, पण लांडगे यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही आणि भाजपानेही तो घेतलेला नाही. नैतिकतेचा डंका पिटणारे फडणवीससुध्दा या विषयावर सोयिस्करणे तोंड फिरवून बसलेत. आज इतका निगरगट्टपणा भाजपामध्ये आलाय. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे संगनमत असल्याने विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने समितीमध्ये राष्ट्रवादीचे सदस्य दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करू म्हटले, पण समिती अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत तोंडावर बोट ठेवले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी,` आम्ही दोषींवर कारवाई करू`, असे म्हटले होते, आता त्यालाही पाच दिवस झाले. शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सोमवारी महापालिका भेटीत पत्रकारांशी बोलताना नितीन लांडगे यांचा राजीनामा भाजपाने घेतला पाहिज, अशी मागणी केली. गेल्या पंचवार्षीकला अख्तर चौधरी या काँग्रेस नगरसेवकाने २०,००० रुपयेंची लाच घेतली म्हणून लाचलुचपतने कारवाई केली होती, तर त्याच्या अपात्रतेचा ठराव महापालिका सभेत प्रशासनाने मांडला होता. आताचे महापालिका आयुक्त राजेश पाटील हे अद्याप लांडगे यांच्याबाबत काही बलायला तयार नाहीत. गुन्हा सिध्द होत नाही तोवर गुन्हेगार ठरत नाही, हा सोयिस्कर युक्तीवाद समजू शकतो. पण संतमहंतांचे संस्कार असलेल्या नितीन लांडगे यांनीच आता अधिक विलंब न करता निष्कलंक असल्याचे सिध्द होत नाही तोवर या गच्याळ राजकारणातून बाजुला झाले पाहिजे. अन्यथा भ्रष्टाचाराच्या मुद्यावर उद्या पिंपरी चिंचवड भाजपाची नौका बुडाली तर बिल त्यांच्या नावावार फाडले जाईल. नैतिकतेची चाड असेल तर राष्ट्रवादीच्या ४ आणि शिवसेनेच्या १ समिती सदस्यांनीही, अशा भ्रष्ट्र स्थायी समितीत आम्ही काम कऱणार नाही, असा राजकीय पवित्रा घेतला तर भाजपाचीही पळता भुई थोडी होईल. या प्रकऱणात आढवडाभरात भाजपाची बेअब्रु झाली, पण राष्ट्रवादीचीही इज्जत गेली. शरद पवार, अजित पवार दखल घेतील काय?