अजित पवारांनी ‘ते’ मनाला लावून का घेतले? – राज ठाकरे

1023

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – आगामी निवडणुकांमध्ये पराभव दिसू लागल्यामुळे लोकसभेसह ११ राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याचे खूळ भाजपच्या सरकारच्या डोक्यात आले आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. भाजप आता निवडून येणार नाही याची पंतप्रधान मोदींना भीती वाटत आहे, त्यामुळेच एकत्र निवडणुकांचा घाट घातला जात आहे, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली.   त्यानंतर पत्रकार परिषेदत बोलताना ते म्हणाले की, पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मी जे बोललो ते १९६० पासून सुरू आहे. अजित पवारांनी ते मनाला लावून का घेतले? माहित नाही, मात्र अजित पवारांनी ती गोष्ट मनाला लावून घेऊ नये, असेही राज ठाकरे म्हणाले.

सध्या देशात ‘वन नेशन वन इलेक्शन’ची चर्चा रंगू लागली आहे. तर दुसरीकडे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रक्रियेसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागेल असे म्हटले आहे. अशात याच मुद्द्यावरून मोदींना पराभव स्पष्ट दिसू लागल्यानेच वन नेशन वन इलेक्शनचा घाट घातला जात आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.