भाजपमधील दिग्गजांची खदखद

0
296

मुंबई,दि. १४ (पीसीबी) : विधानपरिषद निवडणुकीत निष्ठावंत व जेष्ठांना डावलून उपऱ्यांना उमेदवारी दिल्याने भाजपामधील दिग्गज मंडळींची खदखद बाहेर आली आहे. ज्यांना डावलले ती नेते मंडळी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करून नाराजीला वाट करून देत आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंपासून सुरु झालेली ही नाराजांची मालिका आता पंकजा मुंडेंपासून ते माजी मंत्री राम शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. राम शिंदे यांनीही सोशल मीडियावर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

राम शिंदे यांनी ट्विटरवरुन निशाणा साधून आपली भूमिका मांडली. राम शिंदे म्हणाले, “विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी नेते, इच्छुक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील असं म्हटलं होतं. त्या अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास (त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) केला. जो अभ्यास मला आणि इतरांना जमला नाही”

राम शिंदे यांच्या मते, चंद्रकांतदादांनी स्वत:च स्वत: समजावून घेण्यास सांगितलं, त्यानंतर 11 मे रोजी पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन स्वत: शिकत असल्याचं ट्विट केलं. मग भाजपने आपला उमेदवार बदलून, पंकजा मुंडेंचे समर्थक असलेले रमेश कराड यांना उमेदवारी दिली. त्यावरुन चंद्रकांतदादांनी जो अभ्यास करायला सांगितला होता तो ताईंना जमला, मला जमला नाही, असं राम शिंदे यांचं म्हणणं आहे.

पंकजा मुंडेंच्या दबावाने राज्य भाजपने उमेदवार बदलून रमेश कराड यांना उमेदवारी दिली, तसा दबाव बनवणे आपल्याला जमलं नाही, असं राम शिंदे यांचं अप्रत्यक्ष म्हणणं आहे.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपने खडसे, बावनकुळे, पंकजा मुंडे या शर्यतीतील नेत्यांना डावलून तिकीट वाटप केलं. त्यावरुन हे नेते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील म्हणाले होते, “एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काही विचार केला असेल. हे सगळे इतके चांगले कार्यकर्ते आहेत हे तिघेही समजूतदार असतील, ते स्वतःच स्वतःला समजावून सांगतील”

चंद्रकांत पाटलांच्या या प्रतिक्रियेनंतर पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर चित्र प्रकाशित करुन स्वतःच स्वतःला शिकवते आहे, शून्यापासून सुरु केलं, चित्र चांगलं जमेल थोडे दिवसात असं म्हटलं होतं.