भाजपच कसबा उमेदवारीचाही निर्णय झाला

0
251

– चिंचवडला आश्विनीताई, तर कसब्यातून शैलेश टिळक यांच्या नावाची फक्त घोषणा बाकी

पुणे, दि. २ (पीसीबी) : महाआघाडी म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस हे सर्व भाजप विरोधक एकत्र लढण्याची चिन्ह दिसू लागल्याने उमेदवारीच्या मुद्यावर अधिक घोळ न घालता सहानुभूतीच्या लाटेवर स्वार व्हायचे भाजपने ठरवले आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनीताई आणि कसबा मतदरासंघात दिवंगत आमदार मुक्ता टीळक यांचे पती शैलेश यांना संधी द्यायचे भाजपमधून निश्चित झाले आहे, असे समजले. अधिकृत घोषणा नवी दिल्लीतून दोन दिवसांत होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही जागा लढविण्याठी सर्व पक्षातील नेत्यांसह अनेक कार्यकर्तेही इच्छुक आहेत. सर्वच पक्षातून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांची रस्सीखेच सुरू आहे.
असे असतानाच आज मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यामुळे भाजपकडून शैलेश टिळक हेच उमेदवार असण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पोटनिवडणुकित राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी त्यांची सर्व ताकद एकवटलेली दिसत आहे. सुरवातीला स्वतंत्र लढणार असे म्हणणाऱ्या महाआघाडीतील तीनही पक्षांंतून आता समंजसपणाचा सूर आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेस लढणार , तर चिंचवडमधून राष्ट्रवादी किंवा शिवसेना मिळून उमेदवार देणार आहेत. दुरंगी लढत झाल्यास त्याचा भाजपला फटका बसू शकतो आणि स्वतंत्र लढलोच तर मतविभागणीमुळे पुन्हा भाजप उमेदवार जिंकणे सोपे होईल, याचा अंदाज महाआघाडीच्या नेत्यांना आला आहे. पुणे, मुंबई शहरात उमेदवारीसाठी महाआघाडीच्या बैठका सुरू असून ५ फेब्रुवारी पर्यंत नाव निश्चित होणार आहे, असे समजले.
दरम्यान, भाजपला धडा शिकविण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आल्याने आता भाजपनेसुध्दा आपली व्युहरचना बदलली आहे. दिवंगत आमदारांच्या घरातच संधी दिली तर किमान सहानुभूतीमुळे जागा जिंकणे सोयिचे होईल, असे चाचपणीत आढळल्याने वारसांनाच उमेदवारी द्यायचे ठरले आहे.