भाजपच्या ‘या’ अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत – रोहित पवार

0
236

मुंबई,दि.०७(पीसीबी) – बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपा अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा समोर आणताना दिसत आहे. याच मुद्यावरून आमदार रोहित पवार यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.

“सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं व आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवलं केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूनंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरूवातील मुंबई पोलिसांकडे होता. त्यानंतर सीबीआयकडे देण्यात आला. बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपानंतर बिहार सरकारनं या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.