भाजपचे दूध दरवाढ आंदोलन सुरू

0
251

मुंबई, दि. २० (पीसीबी) : राज्यभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोसळलेल्या दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे देखील दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यात किसान सभेचे डॉ. अजित नवले, शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्यासह अनेकजण सहभागी झाले. दूध दरवाढीसाठी भाजपचं आंदोलन, संगमनेर तालुका भाजपच्यावतीने आंदोलन, प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिलं, फिजीकल डिस्टन्सिंगचेही पालन केले.

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात हे दूध दर वाढीचं आंदोलन केलं जात आहे. यात अनेक शेतकरी संघटना आणि पक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलनकर्त्यांनी दुधाला प्रतिलीटर 30 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. यासाठी शेतकरी थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार पाषाण हृदयी असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचाही आरोप केला. या आंदोलनात किसान सभेचे डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, सुरेश नवले आदी नेत्यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, त्यांच्या काळात सलग 3 वर्षे दुधाचे दर कोसळले, सर्व शेतकरी 3 वर्षे आंदोलन करत होते, पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले होते, शेवटी सरकार जाताना त्यांनी थोडी मदत केली, आमच्या सरकारने मागील 4 महिन्यांपासून दुधाच्या प्रश्नात लक्ष घातलंय असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.