भाजपचा राज ठाकरेंवर स्ट्राईक; रमेश किणी प्रकरण काढणार ?

0
892

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – भाजप आणि पंतप्रधान मोदी यांची व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून पोलखोल करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेरण्याची रणनिती भाजपने आखली आहे. मोदींची जुनी भाषणे आणि वास्तवातील परिस्थिती  यातील  तफावत दाखवून  दिल्याने  भाजपची  झोप उडाली आहे. त्यामुळे  रमेश किणी प्रकरण, दादरच्या कोहिनूर मिलची खरेदी  हे मुद्दे  काढून राज ठाकरेंना अडचणीत आणण्याची  खेळी भाजपने केल्याचे सूत्रांकडून समजते .

पंतप्रधान  मोदींवरील  राज ठाकरेंनी केलेले आरोप खोडून काढण्यासाठी  राज ठाकरेंच्या भाषणाचे जुने व्हिडिओ दाखवण्याची भाजपने योजना आखली  आहे.  शनिवारी (दि.२७)  मुंबईतील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आधीच २७ एप्रिलला राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलने उत्तर  दिले जाणार असल्याचे सांगितले होते.

राज ठाकरेंविरोधातील प्रेझेंटेशनमध्ये रमेश किणी सुद्धा एक मुद्दा  घेण्याबाबत पक्षामध्ये विचारविनिमय सुरु आहे,  असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.  राज ठाकरे दररोज आपल्या भाषणांमध्ये प्रेझेंटेशन मांडून भाजपाच्या खोटया जाहीराती, फसव्या आश्वासनांची पोलखोल करत आहेत. त्यामुळेच  आता भाजपने   चोख प्रत्युत्तर  देण्याची रणनिती आखल्याचे सांगितले जात आहे.