बोपखेल पुलाच्या कामाची निविदा प्रसिद्ध; आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश आल्याची चेतन घुले यांची माहिती

0
696

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी ४५ कोटी ४६ लाखांची निविदा बुधवारी (दि. ६) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे बोपखेलवासीयांना हक्काचा रस्ता उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. बोपखेल गावासाठी कायमचा रस्ता व्हावा म्हणून भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी लष्कराचे अधिकारी, राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन करून बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्याला अखेर यश आले आहे. तसेच बोपखेल ग्रामस्थांनीही आंदोलनासोबतच शक्य तेथे सहकार्याची भूमिका घेत रस्ता करण्याची आग्रही मागणी कायम ठेवली. त्यामुळे हा प्रश्न सुटण्यास मदत झाली असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी दिली.

यासंदर्भात चेतन घुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलवासीय वर्षानुवर्षे दापोडी येथील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करत होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. तेव्हापासून बोपखेलवासीयांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही करण्यात आली. परंतु, नदीवरील पूल आणि रस्त्यासाठी लष्कराच्या मालकीची चार एकर जागा संपादन करावी लागणार आहे. लष्कराने आधी या जागेचा मोबदला मागितला. जागा मोजणीनंतर बाजारभावानुसार २५ कोटी ८१ लाख रुपये देण्यास महापालिका राजी झाली.

त्यानंतर लष्कराने जागेच्या मोबदल्यात जागेचाच हट्ट धरला. त्यावर प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु, सरकारी काम सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे प्रशासनाने लष्कराला जागा देण्याचा निर्णय तातडीने घेतला नाही. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते नगरविकास विभागाच्या सचिवांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ११ जानेवारी रोजी मुंबईत तातडीची बैठक घेतली. त्यात लष्कराला जागेच्या मोबदल्यात जागा देण्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हा अहवाल तातडीने सरकारला सादर करण्यासाठी आमदार जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला अहवाल दिला आहे. त्यामुळे बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्ता करण्यासाठी आवश्यक जागेच्या मोबदल्यात तेवढीच जागा लष्काराला देण्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पूल उभारण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही पूर्ण केली आहे. महापालिकेने मुळा नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी ४५ कोटी ४६ लाख ३९ हजार १२२ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून पूल उभारण्याच्या कामाला लवकरात लवकर सुरूवात करण्याच्या सूचनाही आमदार जगताप यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे बोपखेल गावाला कायमस्वरूपी हक्काचा रस्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुळा नदीवर पूल उभारण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने बोपखेलवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.”