बोपखेलच्या रस्ता प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर वरिष्ठ अधिकारी हलले; शुक्रवारी मुंबईत तातडीची बैठक

0
1031

पिंपरी, दि. ९ (पीसीबी)– पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेल गावासाठी लष्कराच्या हद्दीतून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका हिराबाई घुले आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात दोघांनीही मंगळवारी (दि. ८) मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. त्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोपखेल गावासाठी लष्कराच्या हद्दीत उड्डाणपूल उभारण्याच्या मोबदल्यात तेवढीच जागा लष्कराला अन्यत्र उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्याच्या महसूल विभागाच्या सचिवांना दिले. त्यानंतर महसूल विभागाच्या अप्पर सचिवांनी शुक्रवारी (दि. ११) संबंधित विभागाच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची मुंबईत तातडीची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत बोपखेलगावासाठी उड्डाणपूल आणि रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक जागेच्या मोबदल्यात तेवढीच जागा लष्कराला अन्यत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय होईल, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

बापखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे बोपखेलमधील ग्रामस्थांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाणे सोईचे ठरत होते. मात्र उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्कराने २०१५ मध्ये सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. हा रस्ता पूर्ववत सुरू करावा, यासाठी बोपखेलकरांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली. त्याला लष्कराने कोणतीही दाद न देता सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता कायमचाच बंद करून टाकला. तसेच बोपखेलवासीयांची गैरसोय दूर करण्यासाठी मुळा नदीवर बोपखेल ते खडकीला जोडणारा तात्पुरता तरंगता पूल सुरू केला.

मात्र हा तात्पुरता तरंगता पूल तात्पुरताच ठरला. त्यामुळे बोपखेलवासीयांना सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटरचा वेढा पडत आहे. नागरिकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने बोपखेलमधून पुढे खडकीत ५१२ येथे निघणारा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळा नदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी यांनी उड्डाणपूल व रस्त्यासाठी लष्कराने ना-हरकत प्रमाणपत्र आणि आवश्यक जागा द्यावी, यासाठी तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरूण जेटली आणि विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सितारमन तसेच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. उड्डाणपूल आणि रस्त्यासाठी लष्कराची चार एकर जागा आवश्यक आहे. या जागेचे लष्कराने मूल्यांकन केले आहे.

लष्कराच्या मूल्यांकनानुसार चार एकर जागेची एकूण किंमत २५ कोटी ८१ लाख ५१ हजार २०० रुपये होते. ही रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिकेने लष्कराला देण्याचा ठराव केला आहे. परंतु, महापालिका देणार असलेल्या किंमतीएवढीच जागा महाराष्ट्र सरकारने अन्यत्र उपलब्ध करून द्यावी, अशी अट लष्कराने घातली आहे. त्यामुळे बोपखेलवासीयांचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. हा प्रश्न तातडीने सुटावा यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका हिराबाई घुले आणि शिक्षण मंडळांचे माजी सभापती चेतन घुले यांनी मंगळवारी (दि. ८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. त्यांना मागणीचे निवेदन देत बोपखेलगावासाठी लष्कराच्या हद्दीत उड्डाणपूल आणि रस्ता तयार करण्याच्या मोबदल्यात आवश्यक जागेपोटी सरकारने तेवढीच जागा लष्कराला तातडीने उपलब्ध करून द्यावी आणि नागरिकांची होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी, अशी मागणी केली.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्याच्या महसूल विभागाच्या सचिवांशी चर्चा करून बोपखेलच्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. या गावासाठी उड्डाणपूल आणि रस्ता करण्यासाठी लष्कराची जेवढी जागा घेण्यात येणार आहे, तेवढीच जागा राज्यात अन्य ठिकाणी लष्कराला उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने अंतिम निर्णय घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या सचिवांना केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या अप्पर सचिवांनी बोपखेलगावच्या रस्त्यासाठी आवश्यक जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित विभागाच्या सर्व सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि. ११) मुंबईत मंत्रालयात तातडीची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत बोपखेलगावासाठी मुळानदीवर उभारण्यात येणारा नियोजित उड्डाणपूल आणि रस्त्यासाठी लष्कराची चार एकर जागा घेण्याच्या मोबदल्यात तेवढीच जागा लष्कराला महाराष्ट्रात अन्यत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय होईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.