बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा गंभीर आरोप, शिवसेनेच्या बड्या नेत्याला ईडी चे टेन्शन

0
377

औरंगाबाद, दि. ८ (पीसीबी) : महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि मंत्री ‘ईडी’च्या (अंमलबजावणी संचालनालय) रडारवर आले असतानाच आता आणखी एका मंत्र्याविरोधात ‘ईडी’कडे तक्रार करण्यात आली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात कोट्यवधी रुपायांची बेनामी मालमत्ता जमावल्याचा आरोप करत ही तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तक्रारीसोबत तब्बल ७८४ पानांचे पुरावे दिल्याचा दावा सुद्धा तक्रारदाराने केला आहे. दरम्यान, स्वतः सत्तार यांना माध्यमांशी बोलताना, तक्रारदार व्यक्ती ही भाजपाची दलाल असल्याचे सांगून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपल्ली यांनी ईडीकडे तक्रार करताना म्हटले आहे की, ‘अब्दुल सत्तार यांच्या गुन्हेगारी (पार्श्वभूमी), प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार, आर्थिक गैरप्रकार, शैक्षणिक संस्थेमधील घोटाळे, कोट्यावधीची अपसंपदा, बेनामी मालमत्ता, उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती, अवैध व्यवसाय आदी बाबत माझ्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार कायदेशीर लेखी तक्रार करत असल्याचं म्हटले आहे. सोबतच अब्दुल सत्तार यांच्याविरोधातील वेगवेगळ्या घोटाळ्या आणि तक्रारीबाबत ७८४ पानांचे पुरावे सुद्धा माझ्याकडे असून ते ईडी कार्यालयात सादर केल्याचा दावा शंकरपल्ली यांनी केला आहे.

२२ प्रकरणांची यादी
शंकरपल्ली यांनी केलेल्या तक्रारीत एकूण २२ वेगवेगळ्या प्रकारचा उल्लेख केलेला आहे. ज्यात शासकीय जमीन हडपणे, आमदार निधीमध्ये भ्रष्टाचार करणे, नोटबंदीत नोटा बदलून घेणे आणि कर्जमाफी घोटाळ्यासह अनेक प्रकरणाचा उल्लेख करत सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर याबाबतची सविस्तर तक्रार आपण ईडीकडे केली असून कायदेशीर कारवाईसत्व तक्रारीची प्रत सिल्लोड पोलीस स्टेशन आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना सुद्धा देण्यात आल्याचा दावा शंकरपल्ली यांनी केला आहे.