बेरोजगारीची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही – उध्दव ठाकरे  

0
597

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) च्या सामनाच्या अग्रलेखातून महागाई, बेरोजगारी या मुद्यांवरुन सरकारला  कानपिचक्या दिल्या आहेत.  मागच्या पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत झालेली घसरण थांबवून २०१९ साली बेरोजगारांना काम देणे हे एकमेव ध्येय आता असायला हवे. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही,  असे अग्रलेखात म्हटले आहे.

देशात बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. ‘नॅशनल सॅम्पल सर्व्हे’च्या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचा दर हा ६.१ टक्के झाला. मागील ४५  वर्षांतील हा सर्वात जास्त आकडा आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन होते व त्या हिशेबाने मागच्या पाच वर्षांत किमान दहा कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते, ते झालेले दिसत नाही व त्याची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही, असेही  अग्रलेखात म्हटले  आहे.

महाराष्ट्र व देशाचे चित्र विदारक आहे. शेती जळून गेली व हाताला काम नाही या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांनी  ही नवी आशा घेऊन मोदी यांना मतदान केले आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ याच मंत्रावर विश्वास ठेवून कोट्यवधी बेरोजगार तरुणांनीही मोदी यांच्या विजयास हातभार लावला आहे. त्यामुळे मागच्या पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत झालेली घसरण थांबवून २०१९ साली बेरोजगारांना काम देणे हे एकमेव ध्येय आता असायला हवे. महागाई, बेरोजगारी, घटते उत्पादन व बंद पडत चालेले उद्योग या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. शब्दभ्रमाचे खेळ करून बेरोजगारी हटणार नाही. अर्थव्यवस्था संकटात आहे. नव्या अर्थमंत्र्यांनी मार्ग काढावा! असे अग्रलेखात म्हटले आहे.