बाळा लोकरेंचे ते वैयक्तिक मत; शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही – संजय राऊत

0
797

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – शिवसेना  चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी  २५ जानेवारीला  फक्त ठाकरे चित्रपटच प्रदर्शित होणार, अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, असा इशारा  दिला आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे स्पष्ट करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.  

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला.  २५ जानेवारीला ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, अशा आशयाची पोस्ट लोकरे यांनी  टाकली आहे. तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना लोकरे यांनी ‘२५ जानेवारीला अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ, असा इशारा  त्यांनी दिला.

यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना ‘ठाकरे चित्रपट हा अनेकांसाठी भावनिक विषय आहे. ते शिवसैनिकांचे वैयक्तिक मत आहे. ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असा खुलासा राऊत यांनी केला.