बारामतीमधून निवडणूक लढवू आणि जिंकूनसुद्धा दाखवू; गिरीश महाजनांचा दावा

0
1196

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – सध्या राज्यात राजकीय नेत्यांकडून एकमेकाविरूध्द लढण्याचे आव्हान प्रतिआव्हान दिले जात आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी जनतेचे चांगलेच मनोरंजन होऊ लागले आहे. पक्षाने आदेश दिला तर बारामतीमधून निवडणूक लढवू आणि जिंकूनसुद्धा दाखवू, असा दावा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. यामुळे राज्यात अनेक  चर्चांना उधाण आले आहे.  

बारामती पवारांची राजधानी आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर तिथेही निवडणूक लढू आणि जिंकून दाखवू. राष्ट्रवादीकडे सध्या एकही महापालिका नाही, त्यामुळे बारामतीही आम्ही जिंकू, असा दावा  महाजन यांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही  शिरूरमध्ये बोलताना पक्षाने आदेश दिला तर शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढवण्यास तयार आहे. तसेच येथून निवडून नाही आलो, तर पवारांची औलाद सांगणार नाही, अशी गर्जना केली. यावर शिरूरचे शिवसेनेचे  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही माझ्याविरोधात लढून दाखवावे, मी ही अजित पवारांविरोधात लढण्यास तयार असल्याचे प्रतिआव्हान दिले.

त्यापाठोपाठ आता गिरीश महाजन यांनीही बारामतीतून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे विधान केले आहे. यावर  राष्ट्रवादी काँग्रेस कोणती  प्रतिक्रिया देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीआधी राज्याचे राजकारण  तापू लागले आहे. हे राजकीय  नेत्यांच्या आव्हानावरून स्पष्ट होऊ लागले आहे.