बापरे! बनावट कागदपत्रांद्वारे अशी केली तब्बल दहा कोटींची फसवणूक

0
295

दिघी, दि.९ (पीसीबी) : तब्बल 160 गुंठे जमीन बनावट दस्तावेज तयार करून मूळ मालकाच्या परस्पर विक्री केल्या प्रकरणी या प्रकरणात जमीन मालकाची सुमारे दहा कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली असून याप्रकरणी 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान मधुकर गिलबिले (वय 45, रा. वडमुखवाडी, च-होली) आणि अन्य 18 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंडित दगडू गिलबिले (वय 67, रा वडमुखवाडी, च-होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हि घटना सन 2007 पासून 8 मार्च 2021 या कालावधीत वडमुखवाडी च-होली येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडमुखवाडी च-होली येथे फिर्यादी पंडित गिलबिले यांची 7 हेक्टर 23 आर (303 गुंठे) जमीन आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांच्या परस्पर त्या जमिनीतील 160 गुंठे जमीन खोटे दस्तावेज तयार करून विकली. त्यातून आरोपींनी फिर्यादी यांची सुमारे 10 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

आरोपी सोपान याने फिर्यादी यांची समाजामध्ये बदनामी होण्याच्या उद्देशाने ‘यांना आता मी खडी फोडण्यासाठी पाठविणार आहे. यांना अटक झालेली नाही. यांना पोलिसांनी जेलमध्ये डांबून ठेवले आहे’ असे म्हटले. फिर्यादी त्यांच्या जमिनीत गेले असता सहा आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.