फोटोत नाहीत, पण रामाच्या मूर्तीमध्ये तरी मिशा असाव्यात – संभाजी भिडे गुरुजी

0
216

सांगली,दि. ३ (पीसीबी) : प्रभू राम अतुलनीय, पूज्यनीय पुरुष दैवत होते. पण आतापर्यंतच्या फोटोंमध्ये राम-लक्ष्मणाला मिशा नव्हत्या. आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम फोटोमध्ये दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तरी मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्येमधील राममंदिर समितीला केली आहे.

दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे सोहळा साजरा करा.

5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अयोध्यातील राममंदिर भूमीपूजन सोहळ्याबाबत आज सांगली मध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केलीय. 500 वर्षांपासून अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न सुरु होता आणि आता तो साकारला जात आहे. देशातील तमाम हिंदू समाजासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे देशातील हिंदू समाजाने सध्या कोरोनाची परिस्थिती असली तरी कोरोनाला न घाबरता दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे हा सोहळा साजरा करावा. तसेच प्रत्येकाने यानिमिताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही करावे असे आवाहन संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे.

मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम-लक्ष्मणाच्या मूर्त्यांना मिशा असाव्यात अशी विनंती भिडे गुरुजींनी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निमंत्रण नसेल तरी अयोध्याला जावे असा सल्ला भिडे गुरुजींनी दिला आहे.

शरद पवार यांनी राम मंदिर भूमी पूजनाला केलेल्या विरोधावरून निशाणा साधताना ते म्हणाले की, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाने अशा या पवित्र सोहळ्याला विरोध योग्य नाही.
त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत गौरवोद्गार काढताना ते म्हणाले की, ठाकरे यांचे नेतृत्व अत्यंत चांगलं असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यांनी आता महाराष्ट्रभर फिरून कोरोनाच्या बाबतीत असणारे भीती दूर करावी.

शिवसैनिकांनी ऑनलाईन भूमिपूजन करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना आवडली नसती, असं देखील ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांना जरी अयोध्या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण नसले तरी त्यांनी अयोध्येला गेले पाहिजे. कारण की त्यांना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, असं मतही भिडे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रतिमेचे पूजन करून राम मंदिर उभारणीस सुरवात करावी आणि आणि 32 किल्ल्यावरची माती आणि सरोवरातील पाण्याचा मंदिर उभारण्यात वापर करावा. माती आणि पाणी आम्ही अयोध्याला पाठवत आहोत, असेही संभाजी भिडे गुरुजी यांनी यावेळी सांगितले.