फॉलोऑननंतर विंडीजचा कडवा प्रतिकार

0
178

वेलिंग्टन दि.13 (पीसीबी) : सलग दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात फॉलोऑनची नामुष्की आल्यानंतर दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडला निकाराची लढत दिली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा विंडीजने दुसऱ्या डावात ६ बाद २४४ धावा केल्या होत्या. सलग दुसऱ्या सामन्यात डावाचा पराभव वाचवण्यासाठी विंडीजला अजून ८५ धावांची आवश्यकता आहे. जेसन होल्डर ६०, तर जोसुहा डा सिल्वा २५ धावांवर खेळत आहे.

न्यूझीलंडच्या भेदक वेगवान माऱ्याने विडींजचा पहिला डाव फारसा लांबू शकला नाही. सकाळच्या सत्रातील प्रतिकूल परिस्थितीचा न्यूझीलंड गोलंदाजांनी अचूक फायदा उठवला. पहिल्या दोन सत्रात विडींजची तारांबळ उडाली. त्यांच्या सात विकेटस पडल्या. चहापानानंतरच्या अखेरच्या सत्रात मात्र त्यांनी केवळ एक विकेट गमावली. जॉन कॅम्पबेलच्या सुरवातीच्या प्रतिकारानंतर कर्णधार जेसन होल्डर याने चिवट फलंदाजी केली. अपुऱ्या प्रकाशामुळे एक तास खेळ लवकर थांबवावा लागला. होल्डर आणि डा सिल्वा यांनी ७४ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. त्यापूर्वी न्यूझीलंडला विडींजचा पहिला डाव संपवण्यासाठी आज केवळ पाच षटके लागली. टीम साऊदीने दोन्ही फलंदाज बाद करून विंडीजच्या डावाला १३१ धावांवर पूर्णविराम दिला. पहिल्या डावात न्यूझीलंडकडून जेमिसन आणि साऊदी यांनी प्रत्येकी पाच गडी बाद केले.

न्यूझीलंडने फॉलोऑन लादल्यानंतर दुसऱ्या डावांत ट्रेंट बोल्टने विंडीजच्या डावाची दाणादाण उडवली. उपाहाराला त्यांची अवस्था २ बाद ७३ झाली होती. त्यानंतर दुसरे सत्र त्यांच्यासाठी खराब केले. विडींजने या सत्रात पाच गडी गमावले. यात कॅम्पबेल आणि शामराह ब्रू्क्स यांची तिसऱ्या विकेटसाठी झालेली ८९ धावांची भागीदारी विशेष ठरली. पण, त्यानंतर विंडीजच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. अखेरच्या सत्रात कर्णधार होल्डरने डा सिल्वाच्या साथीत केलेला प्रतिकार कौतुकास्पद ठरला. सामन्याच्या चौथ्या दिवशी आता सकाळच्या तासाभराच्या खेळात होल्डर, डा सिल्वा ही नाबाद जोडी कसा खेळ करते यावर विंडीजच्या पराभवाचे अंतर ठरेल.