फुरसुंगी येथे बसने दिलेल्या धडकेत मंत्रालयातील अप्पर सचिवाचा मृत्यू

0
667

पुणे, दि. ४ (पीसीबी) – दुचाकी आणि बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात मंत्रालयातील अप्पर सचिव सुहास रामराव चव्हाण (वय ४९, रा़ टिळकनगर, चेंबूर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात फुरसुंगी मंतरवाडी येथील किर्लोस्कर कंपनीजवळ रविवारी (दि.३) रात्री पावणेनऊच्या सुमारास झाला.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात बसचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुहास चव्हाण हे मंत्रालयात अप्पर सचिव म्हणून काम करत होते. त्यांचे भाऊ हडपसर येथे राहतात. रविवारी रात्री ते त्यांच्या दुचाकीवरुन कात्रजहून भावाकडे जात होते. मंतरवाडी येथे एका वाहनाला चुकवून पुढे जात असताना अचानक समोरुन आलेल्या बसने त्यांना धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन जागीच मृत्यू झाला. तर बसचालक बससह फरार झाला. हडपसर पोलीस आरोपी बसचालकाचा शोध घेत आहेत.