फिल्म इंडस्ट्रीतील कंपुशाहिनेच सुशांतचा बळी घेतला – अभिनेत्री कंगना राणावतचा आरोप

0
521

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचलं जाते, इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असा घणाघात कंगनाने केला.

कंगनाने एक व्हिडीओ पोस्ट करत बॉलिवूडमधील कंपूशाहीवर (नेपोटिझम) निशाणा साधला. कंगना म्हणाली, “ सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूने सर्वांना हादरा बसला आहे. पण काही जण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्या व्यक्तीने स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्कॉलरशीप घेतली आहे. जो इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं कसं असू शकतं? गेल्या काही दिवसातील त्याच्या पोस्ट पाहिल्या, तर हे दिसून येतं की तो सर्वांना विनवणी करतोय, माझे सिनेमे पाहा, माझा कोणी गॉडफादर नाही, मला या इंडस्ट्रीतून काढून टाकतील. त्याने त्याच्या मुलाखतींमध्येही हे वारंवार सांगितलं आहे की, ही इंडस्ट्री मला स्वीकारत का नाही? मला एकटं पडल्यासारखं वाटतं… हा या दुर्घटनेचा पाया नाही?”

“6-7 वर्षांच्या करिअरमध्ये त्याच्या ‘काय पो छे’ सारख्या सिनेमाला त्याच्या पदार्पणाला कुठल्याही प्रकारची पोचपावती का नाही, कुठला अवॉर्ड का नाही मिळाला. केदारनाथ, एम. एस. धोनी किंवा छिछोरे सारख्या सिनेमांना अवॉर्ड नाही, गल्ली बॉय सारख्या सिनेमाला अवॉर्ड मिळतो मग छिछोरेला का नाही”, असा सवाल कंगनाने उपस्थित केला.
“आम्हाला तुमचं काही नको, तुमचे सिनेमे नको, पण जे आम्ही करतो तुम्ही ते का नाही पाहात. मी ज्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं, त्या सिनेमांना यांनी फ्लॉप ठरवलं, माझ्यावर 6 खटले का चालवण्यात आले, मला तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न का केला गेला”, असंही ती म्हणाली.

“काही पत्रकार सुशांत सिंह राजपूतला मनोरुग्ण ठरवत आहेत. त्यांना संजय दत्तचं व्यसन तर तुम्हाला क्युट वाटतं. हेच पत्रकार मला मेसेज करतात की, तुझा खूप वाईट काळ सुरु आहे, तू कुठले चुकीचा निर्णय नको घेऊस, असे का म्हणतात हे. हे का माझ्या डोक्यात या गोष्टी भरु इच्छितात की मी आत्महत्या करायला हवी. मग ही आत्महत्या होती की खून”, असा आरोप कंगनाने केला आहे.

“ सुशांतची चूक ही होती की त्याने या लोकांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी म्हटलं ही तु वर्थलेस आहेत आणि त्याने ते मानलं. तो त्याच्या आईचं म्हणणं विसरला. या लोकांना इतिहास लिहायचा आहे, त्यांना हेच सिद्ध करायचं आहे की सुशांतचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं, ते हे नाही सांगणार की खरं काय आहे. पण, आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की इतिहास कोण लिहिणार”, असंही ती म्हणाली.