फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या 366 स्कूल बसवर कारवाई

0
290

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – फिटनेस प्रमाणपत्र नसणे, प्रमाणपत्राचे नूतनीकरण नसणे, बसमध्ये प्रथमोपचार पेटीचा पत्ता यासह विविध कारणांसाठी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील नियमभंग करणाऱ्या 366 स्कूल बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून तब्बल 2 लाख 80 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत करण्यात आली.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी राज्य सरकारची एक नियमावली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करून काही वाहनचालक वाहन चालवताना दिसून येतात. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूलबसवर दंडात्मक कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शाळांमध्ये मुलांना पाठविण्यासाठी स्कूल बसचा पर्याय निवडला जातो. शहरात 2 हजार 943 स्कूल बस आहेत. स्कूल बसमधून मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालक हजारो रूपये खर्च करतात. असे असतानाही अनेक स्कूल बस चालकांकडून मुलांच्या सुरक्षिततेची म्हणावी तितकी काळजी घेतली जात नाही. तसेच नियमावलीबाबत अनेक पालक अनभिज्ञ असतात. अशा वेळी आरटीओने नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्याने पालकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. या कारवाईमुळे आपली मुले सुरक्षित वाहनातून प्रवास करतात की नाही, याची माहिती पालकांना मिळाली. विशेष मोहीम राबवून आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बसची तपासणी करण्यात येत आहे.

स्कूलबस नियमावली
बसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी.
स्कूलबसचे योग्यता प्रमाणपत्र असणे आवश्‍यक
विद्यार्थ्यांना सहजासहजी चढता उतरता येईल, अशा पायऱ्या असाव्यात.
अग्निशमन यंत्रणा व सीसीटीव्ही यंत्रणा असावी.
बस 15 वर्षांहून जुनी नसावी.

”विद्यार्थी वाहतुकीसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जे मानांकन आणि नियमावली आहे तिचे प्रत्येक स्कूल बस चालकांनी पालन करावे. दोषी वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत 366 स्कूल बस चालकांवर कारवाई करून 2 लाख 80 हजारांचा दंड वसूल केला आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यास परमिट रद्द होऊ शकते. त्यामुळे स्कूल बसचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले.