फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटकडून महिलेचा विनयभंग: दोघांना अटक

0
305

पिंपरी, दि.१६ (पीसीबी) : फायनान्स कंपनीचा वसुली एजंट एका महिलेच्या घरी थकलेल्या हप्त्याचे पैसे मागण्यासाठी गेला. त्यावेळी महिलेने कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन पैसे भरणार असल्याचे सांगितले. आपल्याकडे पैसे का दिले नाहीत, या कारणावरून फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने महिलेसोबत वाद घातला, तिचा विनयभंग केला. त्याच्या साथीदारांसोबत येऊन महिलेच्या घराच्या दारावर लाथा घालून तोडफोड केली. याप्रकरणी दोन सख्य्या भावांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 14) सायंकाळी पवनानगर, काळेवाडी येथे घडली. आशिष हणमंत कांबळे (वय 25, रा. पिंपरी), अल्पेश हणमंत कांबळे (वय 23, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या भावाने घेतलेल्या दुचाकीचे पाच हप्ते थकले असल्याने कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीचा वसुली एजंट रविवारी फिर्यादी यांच्या घरी आला. त्यावेळी फिर्यादी यांनी एजंटला उद्या ऑफिसमध्ये जाऊन पैसे भरणार असल्याचे सांगितले. एजंटने त्याच्याकडे पैसे दिले नसल्याच्या रागातून फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. फिर्यादीच्या पतीने याबाबत एजंटला जाब विचारला असता एजंटने त्याच्या साथीदारांसोबत मिळून आरडा – ओरडा केला. दरम्यान, कोयता हवेत फिरवत आरोपी आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांची घरे बंद करून घेतली. फिर्यादी यांनी देखील स्वतःचे घर बंद केले. आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीच्या घराच्या दारावर लाथा मारल्या. तसेच बाहेर पाण्याने भरलेला बॅरल व बादलीतील पाणी सांडून दोन दुचाकींची तोडफोड करून नुकसान केले. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.