फडणवीस, दादा पवार अन् पार्थची भूमिका हा निव्वळ योगायोग कसा म्हणावा…

0
519

थर्ड आय – अविनाश चिलेकर –

महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी मोठे शिजतय हे नक्की. काय ते आताच निश्चित सांगता येणार नाही, पण भविष्यातील घडामोडींची ही नांदी आहे. गेल्या सात-आठ महिन्यांतील घटना घडामोडींचा मागोवा घेतला तर काही धागेदोरे जुळतात. त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की, भाजपकडून गेलेली सत्ता मिळविण्यासाठी कटकारस्थाने सुरू आहेत. शरद पवार यांच्या सारख्या धूर्त, मुरब्बी तेल लावलेल्या पहिलवानामुळे आजवर भाजपाचे सगळे डावपेच फसले. आता पुन्हा पुन्हा नव्याने खेळ मांडला जातोय. पवार यांनी आजवर राजकारणात ज्या काही युक्त्या, क्लुप्त्या केल्या त्याचाच वापर आता भाजपकडून सुरू आहे. सत्तेसाठी कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळायची तयारी आहे. बहुमत नसल्याने फोडाफोडीचेही राजकारणाचा प्रयोग सुरू आहे. कर्नाटक, मध्ये प्रदेशचा पॅटर्न (ऑपरेशन कमळ) महाराष्ट्रावर लागू करायच्या हालचाली, कुजबूज आहे.

दादांचे प्रत्येक पाऊल ही आता `ब्रेकिंग न्यूज` –
अगदी काल परवाचा पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील किस्सा घ्या. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एका व्यासपीठावर आले होते. असे एकत्र येणे ही ब्रेकिंग न्यूज होते, असे धाकल्या पवारांनीच म्हटले. आजवर बातमीच्या व्याख्येनुसार कुत्रं माणसाला चावलं तर ती बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती ब्रेकिंग न्यूज होते. दादा पवारांना ते मान्य नाही. आजही
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपचीच निर्विवाद सत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी अथवा त्यांच्या काकांनी विरोधकांना कसे संपवले हे जगजाहीर आहे. त्यामुळे दादांना काय वाटते यापेक्षा दादा आता कोणती चाल चालणार याकडे अधिक लक्ष आहे. कोरोना संकटात अथवा कुठल्याही विकास कामात राजकारण आणू नका, हे दादांना आता सांगावे लागते. पत्रकारांना दादांची भुमिका काहिसी विसंगत वाटते म्हणूनच त्यांचे आणि फडणवीस यांचे वारंवार एकत्र येणे ही ब्रेकिंग न्यूज होते. अजितदादांचा देवेंद्र फडणविस यांच्या बरोबरचा `तो` पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर पुन्हा घरवापसी, काकां-काकूंच्या सांगण्यानुसार पुन्हा शिवसेनेबरोबरचा नवा संसार या चक्रावून टाकणाऱ्या ब्रेकिंग न्यूज पत्रकार आणि जनताही विसरलेली नाही. दादांची पावले (तिरकी चाल) कशी होती आणि आता कशी पडतात याकडे फक्त काकांचे नाही तर उभ्या महाराष्ट्राचे बारीक लक्ष आहे. काका `हो` म्हणातात त्यावेळी त्याचा अर्थ `नाही` असतो हे माध्यमातील दिग्गजांचे अनुमान आहे. दादांचे जे पोटात आणि तेच ओठातही असते, असे वाटत होते. प्रत्यक्षात दादा ज्या धक्के देतात ते पाहिल्यावर ते सुध्दा काकांच्या सवाई निघाले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पहाटेच्या शपथविधीने तेच दाखवून दिले. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन ठळक घडामोडी पुढच्या पाच पिढ्या लोक विसरणार नाहीत. त्या म्हणजे वसंतदादा पाटील यांचे सरकार काकांनी कसे पाडले की, पडले (पाठित खंजीर वगैरे…) आणि दुसरी घटना म्हणजे फडणवीस-दादापवार यांचा पहाटेचा शपथविधी कसा झाला. या घडामोडींची नोंद दादा कितीही म्हटले तरी पुसता येत नाहीत. म्हणूनच दादांचे वागणे ही ब्रेकिंग न्यूज होते.

ही वादळापूर्वीची शांतात म्हणावी का –
गेल्या सहा महिन्यांतील दादांचे वागणे, बोलणे खटकणारे आहे असे एक जाणकारांचे निरिक्षण आहे. दादा म्हणजे एक घाव दोन तुकडे. दादा म्हणजे दिलेला `शब्द`. दादा म्हणजे बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल. दादा म्हणजे प्रॅक्टीकल राजकारणी. दादा म्हणजे विरोधकांचे पानीपत. आज हे सगळे सगळे दादा हरवून बसलेत, दिसेनासे झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे सरकार आज स्वतः अजित पवार आणि विरोधकांच्या भाषेत समांतर सत्ता केंद्र असलेले काका (शरद पवार) चालवतात. त्यात दादा कुठेतरी हरखून गेलेले दिसतात. दादांच्या पायात कोणीतरी साखळदंड घातलेत, हातात बेड्या आणि तोंडावर चिकटपट्टी लावली आहे. असे त्यांचे कुलूपबंद व्यक्तीमत्व हे चित्र महाराष्ट्रालाही खटकते. अजित पवारांच्या वागण्याबोलण्यात अजित पवार दिसत नाहीत. त्यांची स्वतःची ओळख ते विसरलेत म्हणून कुठेतरी गडबड आहे असे वाटते. तमाम राजकीय विश्लेषकांना तर ही वादळापूर्वीची शांतात वाटते. फडणवीस यांच्या बरोबर दादांनी शपथ घेतली त्यावेळी राष्ट्रवादीचे ३० आमदार त्यांच्या बरोबर होते, अशी एक वदंता होती. एकमेव पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे वगळता काकांना घाबरून सगळ्या आमदारांनी नंतर तोंडे लपवली. त्या सगळ्यांच्या सगळ्या हालचाली थंडावल्यात असे वरवर दिसते. प्रत्यक्षात कुठेतरी करपल्याचा वास येतोय. १९७८ मध्ये पवार काकांनीसुध्दा पुलोदचा प्रयोग केला होता. वसंतदादा बाप माणूस पण त्यांच्या खुर्चीखाली बॉम्ब असल्याचे त्यांनाही अखेरपर्यंत कळले नाही. कडबोळे सरकारचा प्रयोग काकांनी केला होता. त्यावेळी जातीयवादी पक्षांचा विटाळ चालून गेला. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे जमा झालेले काळे ढग सांगतात. राहून राहून वाटते की दादा आणि फडणवीस यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी बांधलेल्या आहेत. राजकारणात काहिपण घडू शकते. काळ हेच त्यावरचे उत्तर आहे.

थेट आजोबांना आव्हान देणारे पार्थ –
दादांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी जी भाजपला साजेशी भूमिका घेतली ती महाराष्ट्राने पाहिली. दोन चार दिवस त्यावर वादळ उठले, घोंगावले आणि शांत झाले. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस पध्दतशीर तपास करत असताना हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा, अशी आघाडी सरकारच्या विरोधातील मागणी करण्याचे धाडस पार्थ पवार यांनी केले. मागणी कोणाकडे तर आघाडी सरकार मधील राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे. नंतरच्या घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने त्या विषयावर निर्णय दिला. निकालयेताच तत्काळ, “सत्यमेव जयते“, असे ट्विट करून आपल्या भावनांना मोकळी वाट पार्थ पवार यांनी करून दिली. त्याचा राजकीय अर्थ खूप खोल आणि दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यावर त्याचे आजोबा अत्यंत कठोर व कटू शब्दांत जाहीरपणे पत्रकारांना सांगतात की, “आमच्या नातवाला आम्ही काडिची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे.“ या विषयावर पोराचा बाप म्हणून तामसी स्वभावाचे अजितदादा पवार हे खट्टू होतात, पण मूग गिळून बसतात. त्याबाबत पत्रकारांनी वारंवार छेडले की, टाळतात कींवा एक संतप्त कटाक्ष टाकतात. मनातले ओठावर येत नाही गिळावे लागते. दादांची देहबोली बरेच काही सांगून जाते. आजोबा आणि नातवाच्या शाब्दिक द्वंद्वात दुसरे कोणी पडत नाही (मोठ्या घरचे दुखणे). पार्थची आत्या (खासदार सुप्रिया सुळे) आणि चुलत काका (अभिजित पवार) यांच्या बरोबर जुजबी चर्चा झाली. नंतर बारामतीत मोठ्या काकांकडे (श्रीनिवास पवार) मुक्कामात घरगुती चर्चा होते. पुढे हा सारा पट खंडित होतो, निर्णय काय झाला ते बाहेर काहीच येत नाही. पार्थ भाजपच्या वाटेवर, अशा काही फुटकळ बातम्या येतात, पण त्याचे खंडन होत नाही. भाजपची नेते मंडळी (निलेश राणे, अतुल भातखळकर) एकीकडे पार्थला मॅच्युअर म्हणतात आणि या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राचे राजकारण या आजोबा व नातवाच्या वादात ढवळून निघाले. पवार यांच्या कुटुंबाचे भांडण म्हणून फडणवीस यांच्यासारख्या सभ्य राजकारण्याने त्याकडे दुर्लक्ष केले (हे सहज घडलेले नाही).

पार्थ-रोहित पवार सवतासुभा –
मावळ लोकसभा मतदारसंघातून “पार्थ उमेदवार नाही“, असे दस्तुरखुद्द काका सांगत असताना पुन्हा पार्थ याची उमेदवारी जाहीर होते आणि प्रचाराचा नारळ काकांनाच फोडावा लागतो. पहिल्याच प्रचार सभेत पार्थचे भाषण फसते. नंतर काकांचे एक सुचक विधान येते. ते म्हणतात, “ठेस लागली की शहाणपण येईल“. होते तसेच पार्थला जोरदार ठोस लागते. मावळात दारून पराभव झाल्यानंतर पार्थ याच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी होते. त्यातच पार्थ राजकारणात सूट होत नसल्याने त्याच्या आजोबांनी दुसरा नातू रोहित पवार याला चाल दिली आणि त्याच्या पारड्यात सगळे वजन टाकले. सवतासुभा तिथेच सुरू झाला. त्याचाच फायदा घेत पवार यांच्या कौटुंबिक एक्यावर घाला घालत स्वतःची पोळी भाजण्याचे काम भाजप करत आहे. पार्थ याच्या वाटचालीला आजोबाच खो घालत असल्याने हे महाभारत तूर्तास शमलेले दिसत असले तरी तसे नाही. पार्थच्या सत्यमेव जयते मध्ये बरेच काही दडलेले आहे. आवाज दाबला पण दादा पवार अथवा पार्थ हे दबणाऱ्यांपैकी नाहीत. हे सगळे धागेदोरे जोडले तर लवकरच कदाचित दोन महिन्यांतच आघाडी सरकारला सुरूंग लागण्याची शक्यता आहे, असे भाकित राजकीय ज्योतिष वर्तवितात. त्यात तथ्य आहे की नाही त्यासाठी थोडी वाट पाहू या.