‘फक्त हिंदूंच्याच सणावर निर्बंध घालणं योग्य नाही. मी असे निर्बंध मानत नाही. त्यांना काय करायचं ते करू देत’

0
437

मुंबई, दि.१० (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान केल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी नरमाईचा सूर आळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर स्वागत करू, असं नारायण राणे म्हणाले. राणेंनी अवघ्या तीनच दिवसात पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नारायण राणे यांनी ‘टीव्ही9 मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं. विकासाची प्रत्येक गोष्ट माझं स्वप्नच आहे. सिंधुदुर्गात विमानतळ मी स्वत: बांधलं आहे. मी मंत्री असताना बांधून पूर्ण केलं आहे. हे विमानतळ 9 ऑक्टोबरला सुरू होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. श्रेय कसलं? जे कोण बोलतंय त्यांचं सिंधुदुर्गाच्या विकासात एक टक्क्याचं श्रेय नाही. काही नाही. विमानतळ बांधून मी पूर्ण केलंय. श्रेयाचा प्रश्न येतो कुठे, असं सांगतानाच मुख्यमंत्री आले तर त्यांचं स्वागत करू, असं राणे म्हणाले.

यावेळी त्यांनी गणरायाकडे राज्याच्या सुखसमुद्धीचे साकडे घातले. गणरायाने आतापर्यंत राणे कुटुंबीयांना सुखी समाधानी ठेवलं आहे. मात्र, गणरायाकडे एक प्रार्थना करेन की. महाराष्ट्रावर कोणतंच संकट येऊ देऊ नको. कोरोनाचं संकट दूर होऊ दे. जनतेला सुखी समाधानी ठेवावं, असं राणे म्हणाले. गणेशोत्सवावरील निर्बंधावरूनही राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली. सणांवर निर्बंध असू नयेत. फक्त हिंदूंच्याच सणावर असे निर्बंध घालणं योग्य नाही. मी असे निर्बंध मानत नाही. त्यांना काय करायचं ते करू देत, असा इशारा राणेंनी दिला.

राणेंनी 7 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची नवी तारीखही जाहीर केली. विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर असं काही नाही. मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही, असं ते म्हणाले होते. त्यावरून गदारोळ उठला होता. शिवसेनेनेही राणेंवर जोरदार टीका करताना हा अधिकार त्यांना कुणी दिला असा सवाल केला होता.

येत्या 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. त्यावेळी मी उपस्थित राहणार आहे. मी आणि ज्योतिरादित्य शिंदे विमानाने मुंबईत येऊ. तिथून सिंधुदुर्गाला जाणार आहोत. सात वर्ष हे विमानतळ बांधून तयार होतं. वाहतुकीला उपलब्ध नव्हतं. मी ज्योतिरादित्य शिंदेना आज सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळाच्या उद्घाटनाचा वेळ घेतला, असं त्यांनी सांगितलं होतं.

या विमानतळाचं क्रेडिट घेण्याचा प्रश्न नाही. 2014पर्यंत मी विमानतळ बांधून घेतले. मी स्थानिक नाही का? नितेश राणे आणि निलेश राणे स्थानिक नाही का? हे विमानतळ आम्ही बांधलं. त्याचं उद्घाटन करण्याचा आमचा अधिकार आहे. श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. जे कोणी म्हणतं आम्ही स्थानिक आहे. त्यांनी संबंधित मंत्र्यांशी बोलावं. आम्ही मंत्र्याशी रितसर बोललो आणि वेळही घेतली आहे. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते मला माहीत नाही. जे परवानगी देणारे मंत्री आहेत त्यांच्याशी भेटून मी बोललो त्यांनी मला हा कार्यक्रम दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.