प्लॉटची नोंद सात बारावर घेण्यासाठी एक लाखांची लाच मागितली; तलाठ्यासह दोघांवर गुन्हा

0
431

रावेत, दि. १७ (पीसीबी) – खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सात बारा उता-यावर घेण्यासाठी तलाठ्याच्या वतीने एका खाजगी व्यक्तीने एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोड करून 30 हजार देण्याचे ठरवत त्यातील 20 हजार लाच घेतली. याप्रकरणी तलाठी आणि खाजगी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाळुंगेच्या तलाठी वर्षा मधुकर धामणे (रा. रावेत) आणि खाजगी व्यक्ती अकबर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शैलेंद्र देसाई यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी महाळुंगे येथे एक प्लॉट खरेदी केला आहे. त्याची नोंद सात बारावर घेण्यासाठी खाजगी व्यक्ती अकबर याने तलाठी आणि सर्कल यांच्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली. तडजोड करून 30 हजार देण्याचे ठरवले. दरम्यान फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 16) आंबेठाण तलाठी कार्यालयात सापळा लावला. दुपारी एक वाजताच्या सुमारास 20 हजारांची लाच घेताना आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतीबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करीत आहेत.