प्रियंका गांधी फक्त दिसायला सुंदर; राजकीय कर्तृत्व काहीच नाही- विनोद नारायण झा

0
728

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – प्रियंका गांधी यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशासंदर्भात बिहारमधील मंत्री आणि भाजपा नेते विनोद नारायण झा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. प्रियंका गांधी या फक्त दिसायला सुंदर आहेत. पण त्याआधारे मत मिळत नाही. त्यांच्याकडे राजकीय कर्तृत्व नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधी यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशासंदर्भात विनोद नारायण झा यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली. प्रियंका गांधी या दिसायला सुंदर आहेत. पण त्या आधारे मत मिळत नाही. त्या रॉबर्ट वढेरा यांच्या पत्नी असून रॉबर्ट वढेरा यांचा भूखंड घोटाळ्यात समावेश आहे. प्रियंका या फक्त दिसायला सुंदर आहेत, पण त्यांच्याकडे राजकीय कर्तुत्व काहीच नाही, असे झा यांनी सांगितले. झा यांच्या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी-वढेरा यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची उत्सुकता अखेर बुधवारी संपुष्टात आली होती. काँग्रेसने प्रियंका यांची उत्तर प्रदेशच्या (पूर्व भाग) सरचिटणीसपदी नियुक्ती केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने हा बहुप्रतीक्षित ‘हुकमी एक्का’ बाहेर काढल्याचे मानले जाते. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी प्रियंका यांच्याकडे निम्मा उत्तर प्रदेश (८० पैकी ४० जागा) सोपवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानलेला गोरखपूर पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येत असल्याने काँग्रेसने भाजपला मोठा राजकीय दणका दिला आहे.