प्रभाग रचना निर्णय, राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी दाखल करणार अवमान याचिका

0
215

पुणे, दि. २७ (पीसीबी) : नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात, पुणे महापालिका निवडणुकीसाठी पूर्वीप्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या याच निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार विरोध केला आहे. पुण्यात या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई महापालिका वगळता बाकी सर्व महापालिकांच्या निवडणुका चार सदस्य प्रभाग पद्धतीनेच घेतल्या जातील, असा निर्णय राज्य सरकारने नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात घेतला होता.

यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने घेतलेला तीन सदस्यीय प्रभागाचा निर्णय बदलण्यात आला आहे. यानंतर राष्ट्रवादीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाच्या चार सदस्य प्रभाग रचनेच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. या नंतरही राज्य सरकारने पुन्हा चार सदस्य प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला असल्याची टीका, पुणे राष्ट्रवादीने केली आहे. याविरोधात आता अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नियोजनाबाबत आधीच गोंधळाचे वातावरण आहे. प्रभाग रचना निर्णयाविषयी राज्य सरकारला न्यायालयाने आदेश दिले. तसेच निवडणुका न घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहे. अशी स्थिती असतानाही, उघडपणे राज्य सरकारकडून नियमांचा भंग केला जात आहे. याविरोधात राष्ट्रवादी न्यायालयात जाणार आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणे, प्रभागपद्धतीत बदल असे निर्णय सरकारने घेतले. मात्र न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिले असताना, त्याला न जुमानता असे निर्णय घेणे न्यायालयाचा अवमान आहे, असे जगताप म्हणाले.