पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी आणखी एका गुंडांच्या टोळीला दिला झटका

0
442

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) : शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी आणि गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून कडक कारवाई केली जात आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आणखी एका गुन्हेगारी पहिला दणका दिला असून त्यांच्या विरोधात मोक्का नुसार कारवाई केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या पप्पू येनपुरे टोळीवर मोक्का कारवाई केली आहे. प्रवीण ऊर्फ पप्पू अनंता येणपुरे (वय 27, रा. आंबेगाव खुर्द), अजित अंकुश धनावडे (वय 24) व अभिजित नंदू बोराटे (वय 31) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. प्रवीण उर्फ पप्पू टोळी प्रमुख आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्यावर 2016 पासून गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका तरुणाला मारहाण करत परिसरात दहशत पसरवून लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली होती.

दरम्यान, त्यांच्या गुन्हेगारी कारवायामुळे त्यांना हद्दपार तसेच ठोस कारवाया केल्या होत्या. पण, तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. यामुळे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, संगीता यादव यांनी या टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे पाठवला. त्या प्रस्तवाची माहिती तपासून त्यांनी हा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे याच्याकडे पाठवला. त्यानी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीवर मोक्काची कारवाई केली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना आवर घालण्यासाठी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 49 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का नुसार कारवाई केली आहे.