पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुख यांच्यासह काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

0
651

मुंबई, दि. २ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख यांचे  पुत्र धीरज, दोन विद्यमान आमदारांसह ५२ उमेदवारांची दुसरी यादी कॉंग्रेस पक्षाने जाहीर केली आहे. काँग्रेसने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.  तर ऊर्वरित ३० पेक्षा जास्त उमेदवारांची यादी बुधवारी रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी, असा पक्षाचा आग्रह होता.  पण चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहण्यासाठी कराड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास पसंती दिली.

लातूर ग्रामीण मतदार संघातून धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुणाल पाटील व राहुल बोंद्रे या दोन विद्यमान आमदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.  माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी आमदार कैलास बोरंटयाल, नागपूरमधील विकास ठाकरे आदींना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

मुंबईमध्ये पत्रकार युवराज मोहिते यांना गोरेगावमधून, तर जगदिश अमिन यांना अंधेरी, दहिसरमधून अरुण सावंत, मुलुंडमधून गोविंद सिंग, प्रवीण नाईक यांना माहिम, जोगेश्वरीतून सुनील कुमरे, राधिका गुप्ते डोंबिवली, कांचन कुलकर्णी कल्याण पश्चिम आणि भिवंडीतून शोएब गुड्डू यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. शिवडीतून उदय फणसेकर,कांदीवली पूर्व अजंता यादव, मलबार हिल हिरा देवसाई यांना उमेदवारी मिळाली आहे. सांगली येथून पृथ्वीराज पाटील यांना संधी देण्यात आली आहे. पेणमधून नंदा म्हात्रे, शिवाजीनगर मतदारसंघातून दत्तात्रय बहिरट यांना संधी देण्यात आली आहे.