पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकविरोधात कठोर पावले उचलण्याच्या तयारीत- ट्रम्प

0
666

न्यूयॉर्क, दि. २३ (पीसीबी) – जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणावाची भर पडली असून दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अनेक लोकांचा मृत्यू झाला असून आम्ही हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले असून यामुळे धसका घेतलेल्या पाकिस्तानने थेट युद्धाची धमकीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केले आहे. ट्रम्प म्हणाले, सध्या भारत – पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. आम्ही दोन्ही देशांच्या संपर्कात आहोत. काश्मीरमधील तणाव कमी व्हावा, अशी आमची इच्छा आहे. भारताने पुलवामा येथील हल्ल्यात ४० जवानांना गमावले आहे आणि ते खूप कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहेत, त्यांची मनस्थिती मी समजू शकतो, असे ट्रम्प यांनी सांगितले.

पाकिस्तानला अमेरिकेकडून १.३ अब्ज डॉलरची आर्थिक मदत दिली जायची. ती मदत आम्ही थांबवली आहे. आम्ही पाकिस्तानसोबत काही बैठका घेणार असून अमेरिकेच्या यापूर्वीच्या राष्ट्रपतींच्या काळात पाकिस्तानला खूप झाला. पण पाकिस्तान अपेक्षित मदत करत नसल्याने मी मदत थांबवली, असे ट्रम्प यांनी सांगितले.