पुरुषांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच महिला सर्व क्षेत्रात यशस्वी – प्रार्थना बेहरे

0
262

विविध क्षेत्रातील 80 कर्तृत्ववान महिलांचा अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या हस्ते गौरव

पिंपरी दि. ९ (पीसीबी) – जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांचा सन्मान करतो. त्याप्रमाणे पुरुषांनाही शुभेच्छा दिल्या पाहिजेत. पुरुष देखील महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. पुरुषांचा पाठिंबा नसेल तर महिला यशस्वी होणे शक्य नाही. पुरुषांच्या पाठिंब्यामुळेच महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून पुढे जात असल्याचे मत सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोरोना योद्धा, शिक्षक, बचत गट चालविणा-या, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील थेरगाव परिसरातील कर्तृत्ववान 80 महिलांचा सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन मंगळवारी (दि.8) गौरव करण्यात आला. थेरगाव गणेशनगर येथील शिव कॉलनी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना खासदार श्रीरंग बारणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थि होते. सरिता बारणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणाल्या, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांना सलग सातवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मावळातील जनतेचा त्यांनी विश्वास सार्थ ठरविला आहे”.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, आरोग्यशिबिर, रोजगार मेळावा, महिला दिन असे विविध लोकोपयोगी कार्यक्रम विश्वजीत राबवित आहे. माझ्या पावलावर पाऊल ठेऊन समाजभान ठेवत राजकारण करत आहे. त्याने असेच कार्य करावे हीच माझी अपेक्षा आहे”.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे म्हणाले, ”प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक महिला खंबीरपणे पाठिशी उभी असते. पुरुष आयुष्यात यशस्वी होण्यासाठी धावपळ करतात. त्यातून यश मिळते. पण, त्यामागे घरातील महिलेचे मोठे पाठबळ असते. महिला घर सावरते. माझ्या जन्मापासून माझे वडील खासदार श्रीरंग बारणे राजकारणात आहेत. त्यांनी पहिली निवडणूक लढविली तेव्हा मी एक वर्षांचा होतो. राजकारणात असल्याने माझे वडील जमेल तसा घरी वेळ देत होते. त्यांच्या पाठीमागे माझी मातोश्री खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळेच ते राजकारणात पुढे जाऊ शकले. समाजाचे प्रश्न सोडवू शकले”. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमीही विश्वजीत बारणे यांनी सांगितली.