पुण्यात एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढला;  वॉर्डबॉयला अटक

0
2686

पुणे, दि. २७ (पीसीबी) – पुण्यातील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवार (दि.२५) उघडकीस आली.

याप्रकरणी पिडित महिला आणि तिच्या पतीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वॉर्डबॉयला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिलेच्या पोटात दुखत असल्याची तक्रार होती. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना एमआरआय काढण्यास सांगितले होते. त्यानुसार ही महिला शनिवारी सायंकाळी एमआरआय काढण्यासाठी जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेली होती. या महिलेला चेंजिंग रुममध्ये कपडे बदलण्यास नेण्याऐवजी दुसऱ्या खोलीत कपडे बदल्यास सांगितले. त्यानंतर ही महिला एमआरआय करुन आली. तेव्हा परत दुसऱ्या खोलीत कपडे बदल्यास सांगण्यात आले. महिला जेव्हा कपडे बदलू लागली, तेव्हा तेथे तिला एक मोबाईल दिसला.

तिने हा मोबाईल घेऊन त्यात पाहिले असता ती कपडे बदलत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला होता. ही गोष्ट या महिलेने आपल्या पतीला सांगितली. तिच्या पतीने याबाबत हॉस्पिटल प्रशासनाकडे चौकशी केल्यावर त्यांनी वॉर्डबॉयला बोलवून जाब विचारला. पण पुढे काहीही कारवाई केली नाही. तेव्हा त्यांनी १०० क्रमांकावर फोन करुन पोलिसांना कळविले. ही माहिती मिळताच कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहचले व त्यांनी वॉर्डबॉयला अटक केली. कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करत आहेत.