पुणे पदवीधरमध्ये महाआघाडीचे अरुण लाड यांच्या विजयाची घोषणा बाकी

0
326

 

पुणे, दि. ४ (पीसीबी) : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरु आहे. पदवीधर, शिक्षक आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर  निवडल्या जाणाऱ्या सदस्यांची निवड होणार आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघात  महाविकास आघाडीचे अरुण लाड यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. अधिकृत निकाल येण्याआधीच मतमोजणी केंद्राबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. दरम्यान, विजयाची घोषणा झाल्यानंतर अरुण लाड हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची शिवाजीनगर येथील मोदी बाग येथे सकाळी नऊ वाजता भेट घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. 

अंतिम निकाल येण्यापूर्वीच लाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार अरुण लाड यांना एक लाख २२ हजार १४५ मतं मिळाली आहेत. तर भाजपच्या संग्रामसिंह देशमुख  यांना ७३ हजार ३२१ मतं मिळाली आहेत. लाड यांना तब्बल ५० हजार मतांची आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे, अद्याप निकालाची अधिकृत घोषणा बाकी आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड,  भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होईल असे म्हटले जात होते. परंतु आतापर्यंतच्या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक एकतर्फी झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार रिंगणात आहेत.