पुढील आदेश येईपर्यंत राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

0
484
मुंबई, दि,१७ (पीसीबी) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत माहिती दिली.
“राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे.
“राज्यातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदर याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव- बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्या; तसेच सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केलं. पुढील कार्य कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश देण्यात येणार असल्याचेही मदान यांनी स्पष्ट केलं.