“पीसीबी” घरगुती गणपती सजावट स्पर्धा; चऱ्होलीतील अमोल भोसले कुटुंबाने जिंकला स्मार्टफोन

0
854

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड बुलेटिन अर्थात “पीसीबी टुडे”च्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत चऱ्होली, भोसले वस्ती येथील अमोल भोसले कुटुंबियांनी प्रथम क्रमांक पटकावला. “पीसीबी”चे व्यवस्थापकीय संचालक समर कामतेकर यांच्या हस्ते या कुटुंबाला स्मार्टफोन देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे स्पर्धेतील अन्य विजेत्यांनाही समर कामतेकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरी घरगुती गणेशाचीही सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून खूप मोलाचे सामाजिक संदेश देखील दिला जातो. या घरगुती देखाव्यांना प्रसिध्दी मिळावी, त्याचे कौतुक व्हावे तसेच घरगुती गणेश सजावटीसाठीच्या कौशल्य, कला, गुणांना अधिकाधिक वाव मिळावा यासाठी “पीसीबी”च्या वतीने (www.pcbtoday.in) घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धक कुटुंबांना बक्षिस देण्याचेही “पीसीबी”ने जाहीर केले होते.

या स्पर्धेला पिंपरी-चिंचवडच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धक कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांनी केलेली गणपती सजावट “पीसीबी”च्या फेसबुक पेजवर लाइव्ह दाखवण्यात आले. “पीसीबी”च्या हजारो वाचकांपर्यंत घरगुती गणपती सजावट पोहोचवण्यात आले. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ गुरूवार पिंपरी येथे “पीसीबी”च्या कार्यालयात पार पडला. यावेळी “पीसीबी”चे व्यवस्थापकीय संचालक समर कामतेकर, संपादक भीमराव पवार, उपसंपादक अविनाश सुतार, बातमीदार रोहित साबळे, पूजा डफळ, निर्मला बरकडे, नितीन कोरे, सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख, किशोर हातागळे आदी उपस्थित होते.

स्पर्धेत चऱ्होली, भोसले वस्ती येथील अमोल भोसले कुटुंबियांनी प्रथम क्रमांक पटकावला. या कुटुंबाला समर कामतेकर यांच्या हस्ते स्मार्टफोन बक्षिस देण्यात आले. त्याचप्रमाणे चिखली, रामदासनगर येथील अमोल कदम कुटुंबाने द्वितीय क्रमांक, चिंचवडगाव येथील सुनिता डोईफोडे कुटुंबाने तृतीय क्रमांक, डुडुळगाव येथील राहुल चव्हाण कुटुंबाने चतुर्थ क्रमांक आणि जुनी सांगवी, शिंदेनगर येथील विकास भागवत कुटुंबाने पाचवा क्रमांक पटकावला. या सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. घरगुती गणपती सजावटीची अशा प्रकारे कोणीतरी प्रथमच दखल घेतल्याबद्दल सर्व विजेत्यांनी “पीसीबी”चे आभार मानले.