पीर, फकीर बाबा, तृतीयपंथी यांनी करणी केल्याचे सांगत ज्योतिष महिलेने केली सव्वासात लाखांची फसवणूक

0
232

पिंपरी दि. ६ (पीसीबी) – पीर, फकीर बाबा, तृतीयपंथी यांच्यापैकी कोणीतरी करणी केली असल्याचे सांगत तसेच अघोरी पूजा करायची असून पूजा न केल्यास मृत्यू होण्याची भीती घातली. यापोटी ज्योतिष महिलेने एका व्यक्तीची सव्वासात लाखांची फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 8 जानेवारी 2022 या कालावधीत उद्योगनगर, चिंचवड येथे घडला.

ज्योतिष महिला किमदेवांशी सोलंकी (रा. उद्योगनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत बबनराव टेके (वय 52, रा. हिंगणे खुर्द, पुणे) यांनी शनिवारी (दि. 5) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना होणारा मानसिक त्रास कमी होण्यासाठी ज्योतिष महिला किमदेवांशी हिने ‘तुमच्यावर मुसलमान, पीर, फकीर किंवा बाबा, तृतीयपंथी यांच्यापैकी एकाने करणी केली आहे. फिर्यादी यांच्यावर जास्त मोठ्या प्रमाणात करणी केली आहे. यासाठी गुप्त व अघोरी पूजा करावी लागेल. ही पूजा केली नाही तर मृत्यूची भीती असल्याचे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले.

यासाठी आरोपी महिलेने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सात लाख 21 हजार 491 रुपये बँक खात्यावर ऑनलाइन व रोख स्वरूपात घेतले. यामध्ये फिर्यादी यांची फसवणूक केली. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 420, 387, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भारत वारे तपास करीत आहेत.