पिंपळे गुरवमध्ये पोलिसांवर दगडफेक करून मारहाण; आरोपी फरार

0
511

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – हातात दगड घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन कारवाई करत असताना त्याच्या दोन साथीदारांनी पोलिसांवरच दगडफेक करुन मारहाण केली. आणि बघुन घेण्याची धमकी देऊन दुचाकीवरुन पसार झाले.  ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.२३) रात्री पावनेएकच्या सुमारास पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनच्या समोर घडली.

याप्रकरणी पोलीस हवालदार मनोहर कडु सोनवणे (वय ४६) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खैरे नावाचा तरुण आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशीरा पावनेएकच्या सुमारास आरोपी खैरे आणि त्याचे दोन साथीदार  पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनच्या समोरील रस्त्यावर हातात दगड घेऊन दहशत माजवत होते. यावेळी गस्तीवर असलेल्या सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार मनोहर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खैरे याला ताब्यात घेतले. यादरम्यान त्यांच्यात बाचाबाची झाली आणि लाल रंगाच्या बुलट दुचाकीवरुन आलेल्या खैरेच्या दोन साथीदारांनी पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक करुन मारहाण केली आणि पसार झाले. याप्रकरणी त्या तिघांवर सरकारी कामात अडथळा अणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.