पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘ओबीसी’ आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

0
176

पिंपरी,दि.२३(पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२२ साठी ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 29 जुलै 2022 रोजी ओबीसी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मंगळवारी, 26 जुलै रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरता सोडत काढण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिध्द केली जाणार आहे. 29 जुलै रोजी या प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्याकरता सोडत काढली जाईल.

30 जुलै रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द केले जाईल. 30 जुलै ते 2 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत असेल. 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षणाबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचना यांचा विचार केला जाईल. प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.

ओबीसींचे आरक्षण जाहीर झाले. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण जाहीर करावे असे ठरले. त्यानुसार, निवडणूक आयोग ओबीसींचे आरक्षण जाहीर करणार आहे. यामुळं ओबीसींना राजकीय आरक्षण लोकसंख्येनुसार मिळणार आहे. 29 जुलैला ओबीसींच्या जागा आरक्षित करण्यात येतील. त्यानंतर खऱ्या अर्थानं वॉर्डांचे चित्र स्पष्ट होईल.