पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ऍक्शन मूड’ ऑन; एका दिवसात अनधिकृत बांधकाम प्रकरणी तब्बल ‘एवढे’ गुन्हे दाखल

0
222

 – अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले

पिंपरी, दि.४ (पीसीबी) : पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केल्यास पालिकेकडून त्या बांधकामांवर कारवाई केली जात आहे. सुरुवातीला नोटीस देऊन बांधकाम काढायला सांगितले जाऊन सुद्धा जर दिलेल्या मुदतीत बांधकाम न काढल्यास बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. फक्त बांधकाम पाडले जात नाही तर त्या बद्दल गुन्हेही दाखल केले जात आहेत. गुरुवारी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध पोलीस ठाण्यात जवळपास 27 तर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून एक असे एकूण 28 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे पालिका ‘ऍक्शन मूड’मध्ये आल्याची चर्चा सुरू आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ठराविक उंचीचे बांधकाम करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. अनेकजण परवानगीची कटकट टाळण्यासाठी विनापरवाना बांधकाम करतात. अशी बांधकामे पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येते.

वाकड पोलीस ठाण्यात 11 गुन्हे, पिंपरी पोलीस ठाण्यात 14 गुन्हे तर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 2 असे एकूण 27 गुन्हे महापालिकेकडून दाखल करण्यात आले आहेत. तर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणा कडून चिंचवड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी गुन्हे दाखल झालेल्या संबंधितांना देखील पालिकेने नोटीस बजावली होती. पालिकेने दिलेल्या वेळेत अनधिकृत केलेले बांधकाम काढून टाकण्यास पालिकेच्या नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. मात्र आरोपींनी त्यांचे बांधकाम काढले नाही. याबाबत पालिकेकडून थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पालिकेने सुरु केलेल्या या कारवाईने मागील काही दिवसांपासून जोर धरला आहे. आणि त्यामुळे शहरात पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या लोकांच्या तोंडच पाणी पळालंय.