पिंपरी-चिंचवड मधील वृक्षतोड थांबवा; नागरिकांची थेट पर्यावरणमंत्र्यांकडे मागणी

0
573

पिंपरी,दि.१३(पीसीबी) – पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला नियमितपणे तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. परंतु या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.राज्याचे पर्यावरण मंत्री म्हणून आपण स्वतः प्रकरणाकडे लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना केली आहे.

मिशन सेव्ह ट्रीज महाराष्ट्र यांचा वतीने हि याचिका दाखल करण्यात आली चिंचवड शहरात अधिकारी, कंत्राटदार यांच्याविरोधात केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार नागरिकांना आरोग्यदायी वातावरण देणे गरजेचे आहे असे या याचिकेत म्हणले आहे. झाडे तोडणे, जाळणे, छाटणी करणे, याबाबत महाराष्ट्र वृक्षांचे संरक्षण आणि अधिनियम अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेने दोषींवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.या अधिनियमात झाडांना झालेल्या नुकसानासाठी एक हजार रुपयांपेक्षा कमी दंडाची तरतूद आहे. ती पाच हजारपर्यंत वाढू शकते. तसेच कारावासाची शिक्षाही होऊ शकते.

दरम्यान महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नागरिक आणि संस्थांच्या बैठका होत असूनही बेकायदा वृक्षतोड चालू आहे. आपण पर्यावरण मंत्री म्हणून या प्रकरणात हस्तक्षेप करावा. राज्य शासनाच्या नेतृत्वात बेकायदेशीर वृक्षतोड यावर अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भूमिकेची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.