पिंपरी-चिंचवड मधील अभिजित पवारने चिनी ॲपला शोधला पर्याय

0
267

पिंपरी, दि.4 (पीसीबी) – चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या विश्वासघातकी हल्ल्यानंतर भारतात चिनी मालावर बहिष्काराचा नारा बुलंद झाला. भारत सरकारनेही ५९ चिनी अॅपवर बंदी घातली; परंतु त्याला समर्थ भारतीय पर्याय देणेही गरजेचे होते. भारतीय तरुणांनी यासाठी कंबर कसली. यातच एक तरुण चक्क पिंपरी-चिंचवड मधील असून त्याचे नाव आहे अभिजित पवार. व्हिजेटीआय या नामवंत संस्थेत इंजिनिअरिंग करून पुढे जपानमध्ये त्याने नामवंत कंपनीत नोकरी केली. नंतर स्वतःच्या सॉफ्टवेअर सिस्टीम्स विकसित करायला सुरुवात केली. बालवर्गातील मुलांसाठी हसतखेळत शिक्षण देण्यासाठी ‘लिटल मास्टर’ हे नवीन अॅप बनवले. नुकतेच चिनी ‘शेअर इट’ किंवा ‘झेंडर’ या अॅपला पर्याय देण्यासाठी त्याने आपला जयपूरचा मित्र आश्रय योगी याच्याबरोबर ‘फाईल शेअर’ हे अॅप बनवले जे त्यापेक्षाही उत्तम प्रतीचे असून त्यामुळे मोठ्या साईझच्या फाईल्सपण सहजपणे ट्रान्सफर करता येतात. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरदेखील उपलब्ध आहे.

अशाप्रकारे पंतप्रधानांचे ‘आत्मनिर्भर भारत’चे आवाहन स्वीकारून नवीन पिढी चिनी आव्हानांना तोंड देण्यासाठी उभी राहत आहे; आणि त्यातील एक तरुण आपल्या भागातील रहिवाशी आहे ही आपणा सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे.
विशेष म्हणजे अभिजितला पूर्वी चिनी कंपनीकडून बिझनेससाठी ऑफर देण्यात आली होती; परंतु चीनच्या भारताप्रति वर्तणुकीचा निषेध म्हणून त्याने ती ऑफर नाकारली.
असे युवक हे भारतासाठी आशास्थान आहेत.